बारामती: सध्या महाराष्ट्राचा कारभार भगवान केवळ देवाच्या भरवशावर सुरु आहे, अशी टीका राज्याचे माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. ते शनिवारी इंदापूर-बारामती तालुक्याच्या दौऱ्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची मदत द्यायचे आश्वासन दिले होते. मात्र, अजून त्याचा पत्ता नाही. तसेच सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी ही पूर्णपणे फसवी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
सरकार स्थापन झाले तरी कोणत्याही खात्याला मंत्री नाही. दोन महिन्यांपासून हा सारा गोंधळ सुरु आहे. नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला तरी महाविकासआघाडीतील पक्षांमध्येच खूप भांडणे आहेत. त्यांचे वाद त्यांना लखलाभ असोत. मात्र, या सगळ्यात जनता भरडली जात आहे. राज्याचा एकूण कारभार हा देवाच्या भरवशावर सुरु आहे, अशी टीका यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली.
खातेवाटपाआधीच महाविकास आघाडीला आणखी एक धक्का
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नाराजीसंदर्भातही भाष्य केले. खातेवाटपावरून सध्या महाविकासआघाडीत जोरदार वाद सुरु आहे. अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिल्याचे समजत आहे. या सगळ्याचे काय परिणाम होतील, हे सामान्य माणसाला ठाऊक आहे.
शिवसेना-भाजपच्या नऊ माजी मंत्र्यांना शासकीय बंगले रिकामे करण्याची नोटीस
तसेच राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र आल्याने भाजपची सत्ता खालसा झाल्याच्या आरोपालाही त्यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही सांगली, सोलापूर आणि जळगावमध्ये सत्ता राखली आहे. त्यामुळे पत्रकारांनी सकारात्मक बोलावे, विरोधकांसारखे बोलू नये, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.