'5 स्टार रेटिंग देणं बंद करा,' Tata Punch मध्ये आग लागल्याने संताप, VIDEO शेअर करत म्हणाला "तुमच्यावरचा विश्वास..."

Tata Punch Caught Fire: एसयुव्ही सेगमेंटमध्ये Tata Punch ही सर्वात लोकप्रिय कार आहे. मात्र गेल्या एका महिन्यात दुसऱ्यांदा कारमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, Tata Punch आपल्या सुरक्षेसाठी ओळखली जाते. ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळालं होतं.   

शिवराज यादव | Updated: May 27, 2023, 03:45 PM IST
'5 स्टार रेटिंग देणं बंद करा,' Tata Punch मध्ये आग लागल्याने संताप, VIDEO शेअर करत म्हणाला "तुमच्यावरचा विश्वास..." title=

Tata Punch Caught Fire: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) बुलंदशहर (Bulandshahar) येथे Tata Punch कारमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. Tata Punch मध्ये आग लागल्याची ही गेल्या एका महिन्यातील दुसरी घटना आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना युजरने संताप व्यक्त केला असून, आता 5 स्टार रेटिंग देणं बंद करा अशा शब्दांत सुनावलं आहे. दरम्यान, या व्हिडीओत आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेलं नाही. Tata Punch कंपनीची सर्वाधिक विक्री होणाऱ्या SUV पैकी असून ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये या कारला 5-स्टार रेटिंग मिळालं होतं. 

काय आहे प्रकरण?

ट्विटरला शिवम जावला नावाच्या युजरने 20 मे रोजी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत टाटा पंच कारचं बोनेट उघडलेलं असून, आग लागल्याने इंजिन पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसत आहे. या पोस्टमध्ये युजरने टाटा मोटर्सला टॅग केलं असून लिहिलं आहे की, "टाटा मोटर्स, 5 स्टार सेफ्टी रेटिंगचा दावा बंद करा. माझ्या एक वर्ष जुन्या Tata Punch मध्ये आग लागली आहे. टाटा आपल्यावरील विश्वास कमी करत आहे".

हा व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर टाटा कार्सने अधिकृत ट्वीटर हँडलवरुन तात्काळ शिवमशी संपर्क साधला. यानंतर त्यांनी त्यांच्याकडून प्राथमिक आणि पर्यायी संपर्क क्रमांक, ईमेल आयडी आणि डीलरची माहिती डीएम करत शेअर करण्याचं आवाहन केलं. लवकरच यासंबंधी त्यांच्याशी संपर्क साधला जाईल असं कंपनीने सांगितलं आहे. 

"माझे वडील गाडी चालवत असताना अचानक बोनेटमधून धूर येऊ लागला. त्यांनी गाडी थांबवून पाहिली असता, बोनेटमध्ये आग लागली होती. स्थानिकांच्या मदतीने कशीबशी आग विझवली. पण आगीत इंजिन कंपार्टमेंट पूर्णपणे जळून खाक झालं आहे," असं शिवमने सांगितलं आहे. 

शिवमचं म्हणणं आहे की, त्याने ही कार 15 जानेवारी 2022 ला गाजियाबाद येथून खरेदी केली होती. ही कार 23 हजार किमीपर्यंत चालली आहे. आतापर्यंत तिची केवळ तीन वेळाच सर्व्हिसिंग झाली आहे. चांगली सेफ्टी रेटिंग असल्यानेच आपण ही कार खरेदी केली होती. कारमध्ये आपण कोणत्याही प्रकारची ऑप्टर मार्केट अॅक्सेसरी वापरलेली नाही. 

दरम्यान टाटा पंचच्या कारमध्ये आग लागण्याचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. शिवमने सांगितलं आहे की, टाटा मोटर्सच्या स्थानिक सेंटरने जेव्हा गाडीची पाहणी केली तेव्हा एसयुव्हीच्या पुढील भागात पिशवी अडकली होती असं त्यांनी सांगितलं आहे. तिच्यामुळे आग लागली असा त्यांचा दावा आहे. मात्र टाटा कार्सने अद्याप यासंबंधी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. 

आग लागण्याची महिन्यातील दुसरी घटना

याआधीही Tata Punch कारमध्ये आग लागल्याची एक घटना समोर आली होती. गुजरातच्या नवसारी अलीपूर ब्रीजवर ही घटना घडली होती. येथे Tata Punch SUV मध्ये अचानक आग लागली होती. 

कारचे मालक प्रबल यांनी सांगितलं की, त्यांनी तब्बल एक महिन्यापूर्वी Tata Punch AMT व्हेरियंट खरेदी केलं होतं. तिची एक सर्व्हिंसिंगही अद्याप झालेली नाही. तितक्यातच कार जळून खाक झाली आहे. ते म्हणाले की, मी गाडी चालवत असताना अचानक डाव्या हेडलँपमधून धूर येऊ लागला. मी घाबरुन गाडी तात्काळ थांबवली आणि बाहेर जाऊन पाहिलं तर हेडलँपमध्ये आग लागली होती. यानंतर कारमधील नातेवाईकांना बाहेर काढलं. काही वेळाने कार पूर्पणणे जळून खाक झाली.