TV Presenters Stand on Chair: क्रिकेटमध्ये एक काळ उंच आणि धिप्पाड गोलंदाजांनी गाजवला. खास करुन वेस्ट इंडिजचे गोलंदाज हे त्यांच्या उंचीसाठी ओळखले जायचे. या गोलंदाजांसमोर उभं राहायलाही फलंदाज घाबरायचे. बरं गोलंदाज उंच असेल तर त्याला चांगला बाऊन्स मिळतो त्यामुळे त्यांच्यासमोर उभं राहणं हे फारच आव्हानात्मक असायचं. मात्र आता बाऊन्सरचे नियम आणि इतर तांत्रिक बाबींमुळे उंच गोलंदाजांची धास्ती घेण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी आजही उंच गोलंदाज लक्ष वेधून घेतात हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सध्या सोशल मीडियावर एका उंच गोलंदाजीची चर्चा वेगळ्याच कारणासाठी आहे. या गोलंदाजाचा एक मजेदार फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय.
ज्या गोलंदाजाबद्दल आपण बोलतोय त्याचं नाव आहे मार्को जेन्सन. मार्कोची उंची त्याला गोलंदाजीसाठी फारच फायद्याची ठरते. मात्र ज्याप्रमाणे मार्कोची उंची फलंदाजांना अडचणीत आणते तशीच त्याची उंची सामन्यानंतर प्रेझेंटर्ससाठी अचडणीची ठरते. सामन्यानंतर मार्कोची मुलाखत घेणं हे सुद्धा प्रेझेंटर्ससाठी मोठं टास्क असतं. असाच काहीसा प्रकार सध्या सुरु असलेल्या दक्षिण आफ्रिका 20 लीग या स्पर्धेत घडला. या स्पर्धेमध्ये सनरायझर्स इस्टर्न्स केप विरुद्ध पेक्टोरिया कॅपिटल्स या दोन संघांदरम्यान सामना खेळवण्यात आला. या सामन्यानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये मार्कोची मुलाखत घेणारे दोन्ही प्रेझेंटर्स चक्क खुर्च्यांवर हातात माईक घेऊन उभे आहेत.
विशेष म्हणजे खुर्ची घेतल्यानंतर हे दोन्ही प्रेझेंटर्स कुठेतरी मार्कोच्या उंचीपर्यंत पोहचल्याचं पाहायला मिळत आहे. हा फोटो सनरायझर्स इस्टर्न्स केपच्या अकाऊंटवरुनच शेअर करण्यात आला आहे. "जेव्हा तुम्ही मार्कोबरोबर बोलत असता तेव्हा खरोखरच तुम्हाला तुमचा स्तर वाढवावा लागतो," अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. या खुर्चीवर उभ्या राहून घेतलेल्या मुलाखतीमध्ये मार्कोने त्याला सामन्यात 13 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेता आल्याने सध्या जेतेपद कायम राखण्यासाठी लढणाऱ्या सनरायझर्स इस्टर्न्स केपच्या संघाला विजय मिळवता आला असं म्हटलं आहे.
When you're talking to Marco, you gotta level up—literally! pic.twitter.com/aqTE5gjV2F
— Sunrisers Eastern Cape (@SunrisersEC) January 22, 2025
आता हा फोटो पाहून अनेकांना मार्कोची उंची किती आहे असा प्रश्न पडलाय. तर मार्कोची उंची 6.9 फूट इतकी आहे. मार्को हा दक्षिण आफ्रिकेसाठी अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. मार्कोचा जन्म 1 मे 2020 साली झाला आहे. म्हणजचे मार्को अवघ्या 24 वर्षांचा आहे.