धोनीवर टीका करणाऱ्या आपल्या वडिलांबद्दल युवराज म्हणतो...

भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Updated: Jun 11, 2019, 05:26 PM IST
धोनीवर टीका करणाऱ्या आपल्या वडिलांबद्दल युवराज म्हणतो... title=

मुंबई : भारताचा क्रिकेटपटू युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. सोमवारी युवराज सिंगने पत्रकार परिषद घेतली. यावेळी युवराज सिंग त्याचे वडिल योगराज सिंग यांच्याबद्दलही बोलला. माझे वडिल ड्रॅगनसारखे आहेत. त्यांच्यासोबतचे माझे मतभेद आता संपले आहेत. युवराज आणि त्याच्या वडिलांचे संबंध फारसे चांगले नव्हते. पण क्रिकेटमधून निवृत्त होताना आपण वडिलांसोबत समेट घडवल्याचं युवराजने सांगितलं.

'दोन दिवसांपूर्वी मी वडिलांना निवृत्तीच्या निर्णयाबद्दल सांगितलं. जेव्हा मी त्यांच्यासोबत बोलत होतो, तेव्हा मी घाबरलो होतो. मला लहानपणीचे दिवस आठवले. त्यांच्यासोबत समेट घडवणं माझ्यासाठी चांगला क्षण होता, कारण मागच्या २० वर्षांमध्ये ती त्यांच्यासोबत अशाप्रकारे बोललो नव्हतो.', असं युवराज म्हणाला.

'वडिल माझ्यासाठी नेहमीच ड्रॅगनसारखे होते, त्यांचा सामना करणं खूप कठीण होतं. लहानपणी ते मला क्रिकेटशिवाय कोणताही खेळ खेळायला द्यायचे नाहीत. पण याचा मला फायदाच झाला. मी निवृत्त होत आहे हे ऐकून ते खुश आहेत. तसंच माझ्या खेळाबद्दलही ते संतुष्ट आहेत. त्यांनी मला खेळताना बघून आपलं स्वप्न पूर्ण केलं. जेव्हा कपिल देव यांनी वर्ल्ड कप जिंकला तेव्हा ते टीममध्ये नव्हते, पण जेव्हा मी वर्ल्ड कप उचलला तेव्हा त्यांना खूप आनंद झाला,' अशी प्रतिक्रिया युवराजने दिली.

युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग हे अनेकवेळा वादात राहिले. योगराज सिंग यांनी एमएस धोनीवरही वारंवार टीका केली. योगराज सिंग यांनी धोनीची तुलना रावणाशी केली होती. तसंच धोनीमुळेच युवराज टीमबाहेर गेला. धोनी युवराजला पसंत करायचा नाही, असे आरोप केले होते.

'माझे आणि वडिलांचं नातं कायम वेगळं राहिलं. पण आता आम्ही दोघं पुढे गेलो आहोत. मी त्यांच्यासोबत समेट घडवली आहे, पण त्यांच्याबाबत मला माहिती नाही. आयुष्यभर त्यांनी मीडियामध्ये बोलून माझ्यासाठी अडचणी निर्माण केल्या.', असं वक्तव्य युवराजने केलं. योगराज सिंग यांनी भारतासाठी १ टेस्ट आणि ६ वनडे खेळल्या.