'युवराज सिंग कॅन्सरने मेला असता तर मला गर्व वाटला असता,' वडील योगराज सिंग यांच्या विधानामुळे खळबळ

Yograj Singh on Yuvraj Singh: युवराज सिंगला भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. युवराज सिंगने भारतासाठी खेळताना फलंदाजीसह गोलंदाजीतूनही योगदान दिलं.   

शिवराज यादव | Updated: Jan 15, 2025, 03:26 PM IST
'युवराज सिंग कॅन्सरने मेला असता तर मला गर्व वाटला असता,' वडील योगराज सिंग यांच्या विधानामुळे खळबळ title=

Yograj Singh on Yuvraj Singh: भारतीय क्रिकेट संघाने 2011 मध्ये कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या (MS Dhoni) एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला तेव्हा त्यात युवराज सिंगने (Yuvraj Singh) मोलाची भूमिका निभावली होती. आपल्या या जबरदस्त कामगिरीमुळेच त्याला 'प्लेअर ऑफ द टूर्नामेंट' म्हणून गौरवण्यात आलं होतं. वर्ल्डकप खेळत असतानाच युवराज सिंगला कॅन्सरचं निदान झालं होतं. मात्र त्याने याची जाहीर वाच्यता न करता देशासाठी खेळत वर्ल्डकप जिंकण्याचा निर्धार केला होता. रक्ताच्या उलट्या होत असतानाही युवराज सिंग थांबला नाही आणि अखेर आपला निश्चय पूर्ण केला. दरम्यान युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी मुलाच्या कॅन्सरसंबंधी मोठं विधान केलं आहे. 

अनफिल्टर विथ समदीशला दिलेल्या मुलाखतीत योगराज सिंग म्हणाले, "आपल्या देशासाठी, जरी युवराज सिंगचा कर्करोगाने मृत्यू झाला असता आणि त्याने भारतासाठी विश्वचषक जिंकला असता, तर मी एक अभिमानी वडील झालो असतो. मला अजूनही त्याचा खूप अभिमान आहे. मी त्याला फोनवरही हे सांगितले. रक्ताच्या उलट्या होत असतानाही त्याने खेळावे अशी माझी इच्छा होती. मी त्याला सांगितले, 'काळजी करू नकोस, तू मरणार नाहीस. भारतासाठी हा विश्वचषक जिंकून दे".

युवराज सिंगने जर माझं ऐकलं असतं तर आज तो एक महान क्रिकेटर असता असंही योगराज सिंग यांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, "युवराज सिंगने जर आपल्या वडिलांनी केली त्याच्या 10 टक्के मेहनत दरी घेतली असती तर आज तो एक महान क्रिकेटर असता".

2011 वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगचं प्रदर्शन

युवराज सिंगने 2011 वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने वर्ल्डकपमध्ये 90.50 च्या सरासरीने 362 धावा केल्या होत्या. यावेळी 9 सामन्यात गोलंदाजी करताना त्याने 25 च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या. 

युवराज सिंगचं आंतरराष्ट्रीय करिअर

उल्लेखनीय म्हणजे युवराज सिंगने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 40 कसोटी, 304 एकदिवसीय आणि 58 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. कसोटी सामन्यात 1900 धावा केल्या आणि 9 विकेट्स घेतल्या. याशिवाय, त्याने एकदिवसीय सामन्यांमध्ये 8701 धावा केल्या आणि 111 विकेट्स घेतल्या. उर्वरित टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये युवराजने 1177  धावा केल्या आणि 28 विकेट्स घेतल्या.