'2 वर्षांपासून सुरु होता योग्य खेळाडूंचा शोध,' रोहित शर्माचा खुलासा; शमी आणि राहुल द्रविडबद्दल केलं मोठं विधान

वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार आहे. दरम्यान सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्नांवर मनमोकळी उत्तरं दिली.   

शिवराज यादव | Updated: Nov 18, 2023, 07:24 PM IST
'2 वर्षांपासून सुरु होता योग्य खेळाडूंचा शोध,' रोहित शर्माचा खुलासा; शमी आणि राहुल द्रविडबद्दल केलं मोठं विधान title=

वर्ल्डकप फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ भिडणार असून उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये हा सामना पार पडणार आहे. एकीकडे भारतीय संघ तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा प्रयत्न करेल. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकत षटकार लगावण्याची इच्छा असेल. दरम्यान वर्ल्डकपच्या पूर्वसंध्येला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्याने अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली. तसंच विकेट कशी आहे त्यावर प्लेइंग 11 चा निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं आहे. यावेळी त्याने प्रशिक्षक राहुल द्रविड आणि जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीचं कौतुक केलं. 

अश्विनला संधी मिळणार का? 

"हा एक मोठा क्षण आहे यात कोणताही वाद नाही. आतापर्यंत जे काही झालं आहे ते स्वप्नवत आहे. आव्हानांचा सामना करत लक्ष्य केंद्रीत करणं हे एका खेळाडूला सर्वाधिक आव्हानात्मक असतं. हा आमच्या करिअरमधील मोठा क्षण आहे. त्यामुळे आपली योजना नीट अंमलात यावी यासाठी संयम राखणं महत्त्वाचं आहे. तुम्ही रोज वर्ल्डकप फायनल खेळत नाही. मी वर्ल्डकप पाहत मोठा झालो आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा मोठा क्षण आहे," अशी कबुली रोहित शर्माने दिली आहे.

तसंच प्लेइंग 11 बद्दल बोलताना त्याने सांगितलं की, "अद्याप आम्ही त्यासंदर्भात निर्णय घेतलेला नाही.15 पैकी कोणतेही खेळाडू खेळू शकतात. आम्ही विकेटचं निरीक्षण केल्यानंतर निर्णय घेऊ. विरोधी संघाच्या भक्कम आणि कमकुवत बाजूंचं आकलन करत निर्णय घेतला जाईल," असं रोहितने यावेळी स्पष्ट केलं. 

'मी कर्णधार झालो तेव्हापासूनच....', WC फायनलआधी रोहित शर्माने थोपटले दंड; म्हणाला 'यानंतर माझं करिअर...'

 

रोहितने यावेळी जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या मोहम्मद शमीबद्दल म्हटलं की, "पहिल्या हाफमध्ये मोहम्मद शमी खेळू शकला नाही. त्याच्यासाठी तो फार अवघड क्षण होता. पण सिराज आणि इतर गोलंदाज चांगली कामगिरी करत होते. आम्ही त्याला तुला का संधी दिली जात नाही आहे याबद्दल सांगितलं होतं. तो आपल्या गोलंदाजीवर फार मेहनत घेत होता. यावरुन तो स्पर्धेआधी कोणत्या मानसिक स्थितीत होता हे दिसत आहे".

रोहित शर्माने यावेळी प्रशिक्षक राहुल द्रविडचंही तोंडभरुन कौतुक केलं. "राहुल द्रविडची भूमिका फार मोठी आहे. द्रविडचं खेळाडूंना पूर्ण समर्थन असतं आणि त्यांना स्वातंत्र्य देतो. तो खेळाडूंसाठी उभाही राहतो. 2022 च्या टी-20 वर्ल्डकपनंतर त्याने खेळाडूंचं समर्थन केलं. त्याने भारतीय क्रिकेटसाठी जे केलं ते फार मोठं आहे. त्याचीही या क्षणाचा भाग होण्याची इच्छा आहे," असं रोहित शर्मा म्हणाला. 

 
'मी कर्णधार झाल्यापासून या दिवसासाठी तयार'

"मी कर्णधार झाल्यापासूनच आम्ही या दिवसाची तयारी सुरु केली होती. आम्ही गेल्या 2 वर्षात प्रत्येक खेळाडूची निवड केली आहे. आम्ही प्रत्येकाला त्याची काय भूमिका असेल हे स्पष्ट केलं आहे. यासंबंधी माझ्यात आणि प्रशिक्षकामध्ये अनेक चर्चाही झाल्या. या प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यात प्रत्येकाला त्याची भूमिका माहिती असणं मोलाचं ठरलं आहे. आम्ही ते स्पष्ट राहावं यासाठी मेहनत घेतली असून, उद्याही त्याचा फायदा होईल अशी आशा आहे," असं रोहित शर्माने सांगितलं.