बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गावसकर भारतीय फलंदाजांवर संतापले, 'इतक्या चांगल्या...'

Sunil Gavaskar Blasts Indian Players: भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर भारताची फलंदाजी पाहून संताप व्यक्त केला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 21, 2023, 09:27 AM IST
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गावसकर भारतीय फलंदाजांवर संतापले, 'इतक्या चांगल्या...' title=
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यानंतर गावसकरांचं विधान

Sunil Gavaskar Blasts Indian Players: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये दमदार कामगिरी करताना दिसत आहे. बांगलादेशविरुद्धच्या पुण्यातील सामन्यामध्ये विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमधील 48 वं शतक झळकावत संघाला स्पर्धेतील सलग चौथा सामना जिंकवून दिला. विराटच्या शतकी खेळीमुळे भारताने हा सामना 7 विकेट्स राखून जिंकला. सामन्यातील अगदी शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावा आणि शतकासाठी 3 धावा हव्या असताना विराटने षटकार लगावत दोन्ही गोष्टी साध्य केल्या आणि पुणेकरांनी एकच जल्लोष केला. विराटच्या खेळीची सोशल मीडियावर चर्चा असली तर भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन गील यांनीही उत्तम कामगिरी केली. रोहित 48 धावा करुन बाद झाला तर शुभमनने 52 धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर आलेला श्रेयस अय्यर 19 धावांवर बाद झाला.

विकेट फेकली

श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल ज्या पद्धतीने बाद झाले ते पाहून भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी संताप व्यक्त केला आहे. दोन्ही फलंदाजांनी ज्या पद्धतीने आपली विकेट फेकली ते पाहून माजी दिग्गज खेळाडूने दोघांवरही टीकास्र सोडलं आहे. "त्याने (श्रेयस अय्यरने) त्याचा संयम गमावला. तो 19 धावांवर फलंदाजी करत होता अन् त्याने स्वत:ची विकेट फेकली," असं गावस्कर यांनी अय्यरच्या विकेटनंतर 'स्टार स्पोर्ट्स'वर म्हटलं.

कोहलीचं उदाहरण दिलं

"कोहली असं कधीच करत नाही. कोहली स्वत:ची विकेट कधीच फेकत नाही. तुम्हाला त्याची विकेट कमवावी लागते. खरं तर अशाच पद्धतीने फलंदाजी केली पाहिजे. तो 70 ते 80 धावांपर्यंत जातो तेव्हा त्याला जाणीव होते की आपण शतक झळकावू शकतो. त्याला असं वाटत असेल तर त्यात गैर काय? शतक रोज झळकावता येत नाही," असं गावसकर यांनी म्हटलं आहे.

अय्यर संधी वाया घालवत आहे

"शतक कसं करावं हे तुम्हाला ठाऊक आहे. हे श्रेयस अय्यरने आणि शुभमन गिलने समजून घेणं गरजेचं आहे. शुभनने नुकतीच काही शतकं झळकावली आहेत. पण श्रेयसला शतक झळकावता आलेलं नाही. त्याला इतक्या चांगल्या खेळपट्ट्यांवर चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची संधी मिळतेय आणि ती सुद्धा एवढ्या निष्प्रभ गोलंदाजीसमोर ही संधी मिळत असताना तो विकेट फेकतो आणि चांगली संधी गमावतो," असं गावसकर म्हणाले आहेत.

भारताने मोठ्या फरकाने जिंकला सामना

भारताने 8 ओव्हर बाकी असतानाच सामना जिंकला. 257 धावांचा पाठलाग करताना भारताने 3 बाद 261 धावा केल्या. कोहलीने 48 वं शतक झळकावल्याने तो आता सचिन तेंडुलकरच्या 49 शतकांच्या विक्रमापासून केवळ एक शतक दूर आहे.

विराटचं दमदार शतक

विराटने 97 चेंडूंमध्ये 103 धावा केल्या. नाबाद राहिलेल्या कोहलीने 6 चौकार आणि 4 षटकार लगावले आहेत. विराटने पहिल्या 4 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये 50 हून अधिक धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराटने 85 तर अफगाणिस्तानविरुद्ध त्याने 55 धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध विराट 18 धावांवर बाद झाला.