वर्ल्डकपच्या सेमी-फायनलमध्ये भारतीय संघाने न्यूझीलंड संघाचा पराभव करत फायलनमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात विराट कोहलीने शतकांचं अर्धशतक केल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दरम्यान शतकी खेळी करताना विराट मैदानात क्रॅम्पने त्रस्त होता. यावेळी न्यूझीलंड संघाने खेळभावना दर्शवत विराट कोहलीला मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. यावरुन ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू सायमन ओडोनेल यांनी नाराजी जाहीर केली आहे. आपल्याला न्यूझीलंड संघाचं हे कृत्य आवडलं नसल्याचं ते म्हणाले आहेत.
मुंबईतील वानखेडे मैदानात भारत-न्यूझीलंड सेमी-फायनल सामना पार पडला. विराट कोहली. श्रेयस अय्यर, के एल राहुल शुभमन गिल यांची फलंदाजी आणि मोहम्मद शामीने घेतलेल्या 7 विकेट्सच्या जोरावर भारताने 70 धावांनी हा सामना जिंकला. दरम्यान विराट कोहली 35 धावांवर असताना पायात क्रॅम्प आल्याने त्रस्त होता. यावेळी न्यूझीलंडचे काही खेळाडू त्याच्या मदतीसाठी पुढे आले.
"मला काल रात्री झालेल्या सामन्यातील काही गोष्टी खटकल्या आहेत. विराट कोहलीला क्रॅम्प आला असताना आणि 400 धावांकडे वाटचाल करत असताना न्यूझीलंडचे काही खेळाडू मदतीसाठी पुढे गेले होते," असं सायमन ओडोनेल Sen Radio वर म्हणाले. सायमन ओडोनेल हे माजी जलदगती गोलंदाज असून ऑस्ट्रेलियाकडून 87 एकदिवसीय सामने खेळले आहेत.
"विराट कोहलीला क्रॅम्प आला असताना तुम्ही पुढे जाऊन मदत करण्याची गरज काय होती? जेव्हा त्यांचा संघ 400 धावांकडे वाटचाल करत होता. नियमात खेळणं ही खेळभावना आहे. विराट कोहली तुमची चिरफाड करत आहे आणि तुम्ही पुढे जाऊन मदत करु इच्छित आहात," अशा शब्दांत त्यांनी सुनावलं.
दरम्यान, विराट कोहलीला मदत केल्याने सामन्यावर काही फरक पडला का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले, जेव्हा विराट कोहलीला क्रॅम्प आला होता तेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंनी त्याच्या आसपासही जायला नको होतं. "काळजी करण्याची गरज नव्हती. क्रॅम्प आलेला असताना तुम्ही विराट कोहलीच्या 20 मीटर आसपास कुठेच जायला नको होतं," असं त्यांनी सांगितलं.
"विराट कोहलीने आपली बॅट फेकून दिली आणि न्यूझीलंडचे खेळाडू ती उचलण्यासाठी गेले. तुला हॅमस्ट्रिंग आणि क्रॅम्पचा त्रास होत असेल तर स्वत: जाऊन बॅट उचल. आम्हाला चौकार आणि षटकार मारणं बंद कर. ही फार मोठी गोष्ट नाही. हे खेळभावनेच्या विरोधात नाही. हे स्पर्धात्मक आहे. तुम्ही फक्त इतकंच म्हणा की, अच्छा त्याला त्रास होत आहे. तो नीट व्हावा यासाठी तुम्ही कशाला मदत करत आहात?," अशी विचारणा त्यांनी केली आहे.
भारताचा आघाडीचा फलंदाज शुभमन गिल क्रॅम्पमुळे 79 धावांवर रिटायर्ड हर्ट होऊन तंबूत परतला होता. तर कोहलीदेखील क्रॅम्पचा सामना करत होता. "मला अजिबात समजलं नाही. तुमही त्याला मदत करत आहात. त्याने 50 एकदिवसीय शतकं ठोकली. तुम्ही त्याला सेमी-फायलनमध्ये 50 वं शतक पूर्ण करण्यासाठी मदत करण्याची गरज काय?," असं ते म्हणाले.