'डाकू महाराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, बॉबी देओलची एन्ट्री पाहून चाहते म्हणाले 'ब्लॉकबस्टर'

नंदामुरी बालकृष्णाचा अॅक्शन-ड्रामा असणारा 'डाकू महाराज' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओल मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे. 

सोनेश्वर पाटील | Updated: Jan 5, 2025, 04:31 PM IST
'डाकू महाराज' चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, बॉबी देओलची एन्ट्री पाहून चाहते म्हणाले 'ब्लॉकबस्टर' title=

Daaku Maharaaj Trailer : 2025 मधील सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या चित्रपटांपैकी एक असलेल्या 'डाकू महाराज' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. नंदामुरी बालकृष्णा स्टारर या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल मुख्य खलनायकाची भूमिका साकारणार आहे. बॉबी कोली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर या चित्रपटातील एक गाणं काही दिवसांआधी प्रदर्शित झाले असून आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

'डाकू महाराज' या चित्रपटाच्या ट्रेलरची सुरुवात एका लहान मुलाने कथा सांगताना होत आहे. ज्यामध्ये 'डाकू महाराज' यांचा निरपराधांचे रक्षणकर्ता म्हणून वर्णन करण्यात आले आहे. त्यानंतर नंदामुरी बालकृष्णा दमदार एन्ट्री करतो. त्यानंतर चित्रपटाची कथा वर्तमानाकडे वळते, जिथे नंदामुरी बालकृष्णाला एका मुलीचा 'आजोबा' म्हणून दाखवले जाते. या चित्रपटात नंदामुरी बालकृष्णाची दुहेरी भूमिका आहे. ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्कंठा आणखी वाढली आहे. नंदामुरी बालकृष्णाने त्यांच्या भूमिकेत कमी पण उत्कृष्ट संवादांनी जबरदस्त प्रभाव पाडला आहे. या चित्रपटात बॉबी देओल देखील दिसणार असून 2025 मधला हा त्याचा पहिला चित्रपट असणार आहे. 

दबिड़ी दिबिड़ी गाण्यामधील डान्सवरून उर्वशी ट्रोल

'डाकू महाराज' या चित्रपटातील एक गाणं नुकतेच प्रदर्शित झाले आहे. या गाण्यातील उर्वशी रौतेलाचा दबिड़ी दिबिड़ी गाण्यावरील डान्स पाहून चाहते भडकले आहेत. अभिनेत्रीच्या या गाण्यावर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यासोबतच या गाण्यातील काही स्टेप्स अश्लील असल्याचं देखील चाहत्यांनी म्हटलं आहे. तर काही चाहत्यांनी हे गाणं काढून टाकण्याची किंवा पुन्हा शूट करण्याची मागणी केली आहे. या गाण्यातील अश्लील डान्समुळे नवा वाद देखील सुरु झाला आहे. 

'डाकू महाराज' चित्रपट या दिवशी होणार रिलीज 

'डाकू महाराज' या चित्रपटात नंदामुरी बालकृष्णा डाकूच्या भूमिकेत दिसत आहेत. निर्मात्यांनी नंदामुरी बालकृष्णाला अशा प्रकारे दाखवले आहे की, यापूर्वी त्याला असे कधीही पाहिले नाही. याचित्रपटात अभिनेता बॉबी देओल, उर्वशी रौतेला, प्रज्ञा जैस्वाल आणि श्रद्धा श्रीनाथ यांच्यासह इतर कलाकार देखील असणार आहेत. 'डाकू महाराज' हा चित्रपट 12 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.