मॅन्चेस्टर : यंदाच्या वर्ल्ड कपमधला सगळ्यात महत्त्वाचा भारत पाकिस्तान सामना १६ जूनला खेळवण्यात येणार आहे. आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ मॅच झाल्या. या सगळ्या मॅचमध्ये भारताचा विजय झाला. पण यावेळी भारताला पराभूत करण्यासाठी पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वकार युनूसने पाकिस्तानी टीमला गुरुमंत्र दिला आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वेबसाईटवर बोलताना वकार म्हणाला, 'पाकिस्तानला भारताविरुद्ध जिंकायचं असेल, तर सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. ही गोष्ट कठीण नाही. दोन्ही देशांसाठी ही मॅच अत्यंत महत्त्वाची असते. कोट्यवधी लोकं ही मॅच बघतात. पाकिस्तानचं आधीचं रेकॉर्ड चांगलं नसलं, तरी हा नवीन मुकाबला असेल, तसंच दिवसही नवीन असेल. पाकिस्तानला सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारताचा पराभव केला आहे. पाकिस्तानला सकारात्मक मानसिकता घेऊन मैदानात उतरावं लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तानने चांगली लढत दिली.'
'या मॅचमध्ये पाकिस्तानच्या बॉलरची भूमिका महत्त्वाची असेल. पाकिस्तानच्या बॉलरनी सुरुवातीला विकेट घेतल्या नाहीत, तर ते अडचणीत येऊ शकतात. नवीन बॉलची भूमिका महत्त्वाची असेल. त्यामुळे पाकिस्तानच्या बॅट्समनना स्वत:ची विकेट वाचवून खेळावं लागेल. १० ओव्हरनंतर बॉल स्विंग होणार नाही. त्यामुळे यानंतर बॅटिंग करणं सोपं जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्येही पहिल्या १० ओव्हर निर्णायक ठरल्या,' अशी प्रतिक्रिया वकार युनूसने दिली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मॅचमध्ये ५ विकेट घेणाऱ्या मोहम्मद आमीरचं वकार युनूसने कौतुक केलं. तसंच मोहम्मद आमीरला दुसऱ्या बाजूने कोणीच साथ दिली नसल्याची खंतही त्याने व्यक्त केली. पाकिस्तानी बॅट्समनना शॉर्ट बॉल खेळण्यात येणाऱ्या अडचणींबद्दलही वकार युनूस यांनी चिंता व्यक्त केली आहे. रविवारी भारताविरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तान सर्वोत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास वकार युनूसने् व्यक्त केला.