World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट

२०१९ वर्ल्ड कपला सुरुवात झालेली असली, तरी पावसाने मात्र या स्पर्धेचा खेळखंडोबा केला आहे.

Updated: Jun 13, 2019, 10:15 PM IST
World Cup 2019 : भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचं सावट title=

मॅन्चेस्टर : २०१९ वर्ल्ड कपला सुरुवात झालेली असली, तरी पावसाने मात्र या स्पर्धेचा खेळखंडोबा केला आहे. वर्ल्ड कपमधली भारत आणि न्यूझीलंडमधली मॅच पावसामुळे रद्द झाली आहे. या वर्ल्ड कपमध्ये पावसामुळे आतापर्यंत ४ मॅच रद्द झाल्या आहेत. त्यातच आता वर्ल्ड कपमधली सगळ्यात महत्त्वाची मॅच असलेल्या भारत पाकिस्तान मॅचवरही पावसाचं सावट आहे.

रविवारी १६ जूनरोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात मॅन्चेस्टरमध्ये हा सामना होणार आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट चाहत्यांना हा सामना संपूर्ण ५० ओव्हरचा व्हावा, अशी इच्छा आहे. पण हवामानाचा अंदाज बघितला तर मात्र हे अशक्य वाटत आहे.

मॅन्चेस्टरमधलं सध्याचं हवामान हे ९ अंश सेल्सियस एवढं आहे. तसंच पुढच्या ३६ तासांमध्ये मॅन्चेस्टरमध्ये काळे ढग असणार आहेत. तसंच रविवारी मॅन्चेस्टरमध्ये पाऊस पडेल, असा अंदाज मॅन्चेस्टरमधल्या स्थानिक हवामान खात्यानं वर्तवला आहे.

पावसामुळे यंदाच्या वर्ल्ड कप आयोजनावरून आयसीसीवर टीकेची झोड उठत आहे. यातच भारत आणि पाकिस्तान यांच्यामधला सामना पावसामुळे रद्द झाला, तर आयसीसीला आणखी रोषाला सामोरं जावं लागू शकतं. तसंच हा सामना होऊ शकला नाही तर आयसीसीचं मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होणार आहे.

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान यांच्यात ६ सामने झाले. या सगळ्या सामन्यांमध्ये भारताचा विजय झाला. रविवारी होणाऱ्या सामन्यामध्येही भारत दावेदार आहे. या वर्ल्ड कपमध्ये भारत आणि न्यूझीलंड या दोनच टीमनी अजूनपर्यंत एकही सामना गमावलेला नाही. तर पाकिस्तानने या वर्ल्ड कपमधले २ सामने गमावले, तर एका मॅचमध्ये त्यांचा विजय झाला आणि एक सामना पावसामुळे रद्द झाला. टीम इंडियाने ३ पैकी २ सामने जिंकले, तर एक मॅच पावसामुळे रद्द झाली.