तो फोन कॉल अन्... वाल्मिक कराडविरोधात SIT ला सापडला मोठा पुरावा, सुदर्शन घुलेचंही नाव

Beed News Today: बीड मस्साजोग प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे.  SITच्या तपासाला वेग आला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Jan 11, 2025, 12:27 PM IST
तो फोन कॉल अन्... वाल्मिक कराडविरोधात SIT ला सापडला मोठा पुरावा, सुदर्शन घुलेचंही नाव title=
Walmik Karad and Vishnu Chate call recording viral in beed santosh deshmukh case

Beed News Today: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण, खून आणि पवनचक्की खंडणी प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून नवनवीन अपडेट समोर येत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करण्यात आली आहे.  मस्साजोग येथील पवनचक्की खंडणी प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. त्यामुळं वाल्किम कराडच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

एसआयटीच्या तपासात सुदर्शन घुलेबाबत मोठा पुरावा हाती लागला आहे. सहा डिसेंबर रोजी सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडसोबत दोनदा फोनवर बोलणं झालं होतं. मस्साजोगयेथील पवनचक्की प्रकल्पाच्या सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्यापूर्वी कराडला सुदर्शनने पहिला फोन केल्याचे समोर आलं आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

सुदर्शन घुले आणि कराडचे संभाषण सरपंच संतोष देशमुख यांच्यासह काही गावकऱ्यांशी झालेल्या भांडणानंतर झाले असे तपासात समोर आले आहे. तापासाची चक्र वेगाने फिरत असून कराडसंदर्भात अनेक पुरावे समोर येत आहेत. 

वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले यांच्यात बोलणे झाल्याची माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख यांच्या गावकऱ्यांसोबत सुदर्शन घुले यांच्याशी वाद झाला होता. त्यानंतरही वाल्मिक कराडसोबत त्याचे बोलणे झाले होते. जे काही घडलं त्याचे धागेदोरे SITकडून शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. खंडणीच्या प्रकरणासोबतच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणातही धागेदोरे जोडले असल्याचे समोर येत आहे. 

खंडणी प्रकरणात पोलिसांनी आरोपी विष्णू चाटे याचे काही व्हॉईस सॅम्पल तपास करण्यासाठी घेतले आहेत. विष्णू चाटेचा मोबाईल पोलिसांना सापडला नाहीये. त्याचा तपास सध्या सुरू आहे. तपास प्रक्रियेत मदत होण्यासाठी आता विष्णू चाटेचे काही व्हॉईस सॅम्पल घेण्यात आले आहेत. तसंच, वाल्मीक कराडचे सुद्धा व्हॉईस सॅम्पल घेतले जाणार आहेत. पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यास दोन कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी विष्णू चाटेचे हे व्हॉईस सॅम्पल सीआयडीकडून घेण्यात आले आहेत. यातून आता कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून किती खंडणी मागितली, त्यांच्यात नेमके काय बोलणे झाले, याचा उलगडा या सगळ्यातून होऊ शकतो.

विष्णू चाटेला कोर्टासमोर केलं जाणार हजर?

विष्णू चाटेला संतोष देशमुख हत्या प्रकरणात कस्टडी घेण्यासाठी कोर्टासमोर आज हजर केले जाण्याची शक्यता आहे. सीआयडीने कोर्टाकडे तसा अर्ज केल्याची माहिती आहे. खंडणी प्रकरणांमध्ये विष्णू चाटेला काल न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. न्यायलयीन कोठडी मिळताच सीआयडीने विष्णू चाटेला पुन्हा ताब्यात घेतल्याची माहिती आहे. खंडणीच्या प्रकरणात विष्णू चाटे आरोपी आहे. पुरवणी जबाबांमध्ये विष्णू चाटेच नाव संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये आलेलं आहे. खंडणी प्रकरणांमध्ये न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर प्रक्रिया पूर्ण करून विष्णू चाटेला हत्या प्रकरणांमध्ये कोर्टासमोर हजर केलं जाईल अशी माहिती आहे