नवी दिल्ली : शनिवारी मँचेस्टर येथे पार पडलेल्या क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाचा १० धावांनी पराभव केला. परिणामी श्रीलंकेवर मात करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने गुणतालिकेत प्रथम स्थान मिळवलं आहे. विश्वचषकाच्या अंतिम टप्प्यातील हे सामने खऱ्या अर्थाने यंदाच्या या क्रिकेटच्या मोसमाची रंगत वाढवत आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या ऍडन मार्करॅम आणि क्विंटन डी कॉक यांनी संघाला चांगली सुरुवात करुन देत नऊ षटकांमध्ये ७२ धावा केल्या. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाने खेळावर पकड बनवण्याचा प्रयत्न सुरु केला. नाथन लिओनने मार्करॅम आणि डी कॉक या दोन्ही खेळाडूंना तंबूत परत पाठवलं. ज्यानंतर फाफ ड्यूप्लेसिसने संघाची मदार सांभाळत १५१ धावांच्या भागिदारीसह त्याचं १२वं एकदिवसीय शतकही पूर्ण केलं. दक्षिण आफ्रिकेच्या संघातील खेळाडूंनी धावसंख्येचा हा आकडा ६ बाद ३२५ पर्यंत पोहोचवला.
विरोधी संघाने दिलेल्या या आव्हानाचा पाठिंबा करत मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात फार चांगली झाली नाही. ऍरॉन फिंचला सहाव्या षटाकत बाद करत इम्रान ताहिरने कांगारुंना झटका दिला. उस्मान ख्वाजा याला दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावं लागलं, हा ऑस्ट्रेलियाच्या संघाला बसलेला आणखी एक धक्का होता. पुढे स्टीव्ह स्मिथच्या बाद होण्यानंतर संघाचा डाव कोलमडला आणि डेव्हिड वॉर्नरच्या खांद्यावर साऱ्या संघाचीच जबाबदारी आली. ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स कॅरी याने लक्षवेधी खेळी केली. पण, त्याची खेळीही संघाला पराजयापासून तारु शकली नाही. परिणामी दक्षिण आफ्रिका संघाने १० धावांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियावर मात केली.