मुंबई : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती करण्यात आली आहे. टी 20 वर्ल्ड कपनंतर विद्यमान प्रशिक्षक असलेले रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर राहुल द्रविड कोच पदाची सर्व सूत्र हाती घेणार आहे. द्रविडची प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर अनेक आजी माजी क्रिकेटपटू प्रतिक्रिया देत आहे. वीरेंद्र सेहवागनेही प्रतिक्रिया दिली आहे. सेहवागनेही द्रविडच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया दिली आहे. द्रविड प्रशिक्षक झाल्याने टीम आणि खेळाडूंच्या मानसिक स्थिती स्थिर राहिल, ज्याची खेळाडूंना फार आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया सेहवागने दिली आहे. (Virender Sehwags reaction after the appointment of Rahul Dravid as the coach of Team India)
नेमकं काय म्हणाला सेहवाग?
ज्या खेळाडूंचा आत्मविश्वास कमी आहे, तसेच ज्या खेळाडूंना टीम मॅनेजमेंटकडून आवश्यक तितकं समर्थन मिळालेलं नाही, त्यांना असं वाटणार नाही की एखाद्या सामन्यानंतर आपल्याला संघातून डच्चू मिळेल, असं सेहवागने नमूद केलं.
द्रविड प्रशिक्षक झाल्याने संघात स्थिरता येईल, ज्याबाबत आम्ही नेहमी उच्चार करत असतो. खेळाडूंना विश्वास होईल की मला संघातून डच्चू मिळण्याआधी आणखी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळेल. कारण द्रविड त्या स्तरावर खेळला आहे. तसेच खेळाडूंना वगळण्याआधी त्यांना पर्याप्त संधी मिळायला हवी, असं द्रविडला नेहमीच वाटतं. खेळाडूंमध्ये विश्वासाची उणीव आहे. टीम मॅनेजमेंट खेळाडूंना सपोर्ट करत नाहीये. खेळाडूंना एका सामन्यानंतर ड्रॉप केलं जातं, या विषयावर आम्ही काही वेळा बोलतो. आपल्याला संघातून वगळण्याआधी खेळण्याची संधी मिळेल, असा विश्वास द्रविड कदाचित खेळाडूंमध्ये निर्माण करेल", असं सेहवागने म्हंटलं.
द्रविडच्या प्रशिक्षकपदाची सुरुवात ही न्यूझीलंड दौऱ्याने होणार आहे. टी 20 वर्ल्ड कप स्पर्धा 14 नोव्हेंबरला संपणार आहे. तर टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील मालिकेला 17 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.