म्हणून कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला

अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. 

Updated: Jun 20, 2017, 09:20 PM IST
म्हणून कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला  title=

मुंबई : अनिल कुंबळेनं टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला आहे. सोमवारी रात्री बीसीसीआयनं स्थापन केलेल्या सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या समितीनं इंग्लंडमध्ये बैठक घेतल्याची सूत्रांची माहिती आहे. आपण आता कुंबळेसोबत काम करू शकत नाही, असं विराट कोहलीनं या समितीला सांगितल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.

विराट कोहलीनं घेतलेल्या या आक्रमक पवित्र्यामुळे एकतर विराट कॅप्टन राहिल किंवा कुंबळे कोच हे स्पष्ट झालं होतं. पण कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा देऊन टाकला. आता वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संजय बांगर भारताचा प्रशिक्षक असेल.

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर अनिल कुंबळेचा प्रशिक्षकपदाचा करार संपणार होता. पण वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत कुंबळेलाच कोच ठेवण्यात येणार होतं. पण चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर कुंबळे वेस्ट इंडिजला न जाता इंग्लंडमध्येच थांबला. आयसीसीची बैठक असल्याचं कारण कुंबळेनं सांगितलं.

प्रशिक्षक होण्यासाठी पाच जणांचे अर्ज

टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी बीसीसीआयकडे सहा जणांनी अर्ज केले आहेत. यामध्ये चार भारतीय तर दोन परदेशी खेळाडू आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, अफगाणिस्तानचे प्रशिक्षक लालचंद राजपूत आणि गगन खोडा यांनी अर्ज केले आहेत.

परदेशी खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी ऑल राऊंडर आणि आयपीएलच्या सनरायजर्स हैदराबादचे कोच टॉम मूडी तसंच इंग्लंडचे माजी क्रिकेटपटू रिचर्ड पायबस यांनीही बीसीसीआयकडे अर्ज केला आहे.  या पाच इच्छुकांची सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांची समिती मुलाखत घेईल आणि त्यानंतर टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड होईल.