Sunil Gavaskar on IPL: माजी भारतीय क्रिकेटर आणि समालोचक सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) एकदिवसीय मालिकेत झालेल्या पराभवानंतर एकीकडे कर्णधार रोहित शर्माला खडे बोल सुनावले आहेत, तर दुसरीकडे भारतीय संघाला इशाराच दिला आहे. आयपीएलच्या (IPL) नादात ऑस्ट्रेलियाविरोधात झालेला पराभव विसरु नका असा सल्ला सुनील गावसकर यांनी भारतीय संघाला दिला आहे.
नुकत्याच ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या तीन दिवसांच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाचा पराभव झाला आहे. भारताने 2-1 ने ही मालिका गमावली. भारताने पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला होता. पण नंतरच्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने दमदार पुनरागमन करत भारतीय संघाला पराभवाची धूळ चारली. या पराभवानंतर भारतीय संघावर टीका होत असताना सुनील गावसकर यांनी आगामी वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाला जोमाने तयारी करण्याचा सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधातील झालेल्या पराभवाला विसरु नका, कारण वर्ल्डकपमध्ये हाच संघ पुन्हा तुमच्या समोर उभा असू शकतो असं सुनील गावसकरांनी सांगितलं आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबदरम्यान भारतात वर्ल्डकप पार पडणार आहे.
"31 मार्चपासून आयपीएल सुरु होणार आहे. मालिकेतील हा पराभव विसरता कामा नये. भारत कधीकधी पराभव विसरण्याची चूक करतो. पण हा पराभव विसरता कामा नये. कारण वर्ल्डकपमध्ये पुन्हा ऑस्ट्रेलिया संघाचा सामना करावा लागू शकतो," असं सुनील गावसकर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले आहेत.
"ऑस्ट्रेलिया संघाने दबाव निर्माण केल्यानेच तिसऱ्या सामन्यात भारताचा पराभव झाला. भारतीय फलंदाजांना एक धाव काढणंही मुश्कील झालं होतं. पण अशा स्थितीत तुम्ही सवय नाही अशी खेळी केली पाहिजे. याकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे," असं मत सुनील गावसकर यांनी मांडलं आहे. तिसऱ्या सामन्यात भारतासमोर 270 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय संघ 248 धावांवर गारद झाला. या सामन्यासह भारताने मालिकाही गमावली.
तिसऱ्या सामन्यात विराट कोहली आणि के एल राहुलने केलेल्या 69 धावा आणि रोहित शर्मा आणि शुभमन गिलने केल्लाय65 धावा या दोनच मोठ्या भागीदारी ठरल्या. "जेव्हा तुम्ही 270 किंवा 300 च्या आसपास धावांचा पाठलाग करत असता तेव्हा किमान 90 ते 100 धावांची भागीदारी करायला हवी. पण तसं झालं नाही," अशी खंत सुनील गावसकर यांनी व्यक्त केली आहे.
"राहुल, कोहली अशा काही भागीदारी झाल्या. पण यासह अजून मोठ्या भागीदारी व्हायला हव्या होत्या," असं सुनील गावसकरांनी सांगितलं. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलिया संघाचं कौतुक केलं. "ऑस्ट्रेलियाने उत्तम क्षेत्ररक्षण केलं. त्यांची गोलंदाजीही उत्तम होती. पण त्यांचं क्षेत्ररक्षण जास्त चांगलं होतं, ज्यामुळे जास्त फरक पडला," असं गावसकरांनी सांगितलं आहे.