जे पाकिस्तानच्या बॉलर्सला जमलं नव्हतं, ते सेहवाग-उथप्पाने करुन दाखवलं होतं

दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला तेव्हा निकाल हा बॉल आउटने निश्चित झाला.

Updated: Jul 16, 2021, 07:00 PM IST
जे पाकिस्तानच्या बॉलर्सला जमलं नव्हतं, ते सेहवाग-उथप्पाने करुन दाखवलं होतं title=

मुंबई : टी-20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात ठेवण्यात आले आहेत. म्हणजेच चाहत्यांना क्रिकेटचा सर्वात मोठा थरार बघायला मिळणार आहे. टी-20 वर्ल्ड कप ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. आता टी-20 वर्ल्ड कप पेक्षा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने प्रतिक्षा करत आहेत. अखेरच्या वेळी भारत आणि पाकिस्तान संघाने 2019 च्या विश्वचषकात एकमेकांविरूद्ध सामना खेळला होता, जो भारतीय संघाने जिंकला होता. 

वर्ल्ड कपच्या इतिहासात भारताचा संघ पाकिस्तानकडून कधीही पराभूत झाला नाही. जेव्हा जेव्हा भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असतो तेव्हा क्रिकेटची उत्सुकता शिगेला पोहोचते. असाच एक सामना 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या लीग सामन्यात झाला. दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला तेव्हा निकाल हा बॉल आउटने निश्चित झाला.

सामना बरोबरीत राहिल्यास आता सुपर ओव्हरने निर्णय घेतला जातो. पण 2007 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये बरोबरी साधल्यास सामन्याचा निर्णय सुपर ओव्हरने नव्हे तर ‘बॉल आऊट’ ने घेण्यात आला होता. अशा परिस्थितीत, 14 सप्टेंबर, 2007  रोजी पहिल्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात पहिला टी-20 सामना खेळला गेला होता, जो सामना बरोबरीत सुटला होता, त्यानंतर सामन्याचा निकाल बॉल आउटने झाला होता.

‘बॉल आउट’ मध्ये दोन्ही संघातील पाच गोलंदाजांना गोलंदाजीची संधी देण्यात आली. ज्या संघाचे गोलंदाज सर्वाधिक वेळा स्टम्प वरील बेल उडवतील, तो संघ विजयी घोषित होणार होता.

भारताकडून वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग आणि रॉबिन उथप्पा बेल उडवण्यात यशस्वी ठरले, पण दुसरीकडे पाकिस्तानच्या महत्त्वपूर्ण गोलंदाजांपैकी एकालाही बेल उडवता आली नव्हती. ज्यामुळे भारताने हा सामना 3-0 असा जिंकला होता. उमर गुल, यासिर अराफत आणि आफ्रिदी यांनी पाकिस्तानकडून गोलंदाजी केली पण तिघेही अपय़शी ठरले. हा सामना आजपर्यंत क्रिकेट चाहत्यांना विसरता आलेला नाही.

उथप्पाने आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, कर्णधार धोनीच्या हुशारीमुळे भारताने हा सामना दिंकला. तो म्हणाला की, जेव्हा भारताच्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली तेव्हा धोनी यष्टीरक्षक बनला, ज्याने आम्हाला बेल उडवणे सोपे झाले. आम्हाला फक्त धोनीच्या दिशेने बॉल टाकायचा होता. ज्यामुळे आम्हाला अधिक यश मिळाले.

पाहा व्हिडिओ