बॅट्समन आऊट का नॉट आऊट? व्हिडिओ पाहून सचिनही चक्रावला

यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खराब अंपायरिंगवर बरीच टीका झाली. 

Updated: Jul 25, 2019, 10:21 PM IST
बॅट्समन आऊट का नॉट आऊट? व्हिडिओ पाहून सचिनही चक्रावला title=

मुंबई : यंदाच्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये खराब अंपायरिंगवर बरीच टीका झाली. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या फायनलमध्ये अंपायरनी ओव्हरथ्रोच्या दिलेल्या ४ रनमुळे मोठा वाद निर्माण झाला. या वादानंतर मैदानात असलेल्या अंपायर कुमार धर्मसेना यांनी चूक मान्य केली, पण माफी मागायला नकार दिला. ओव्हरथ्रोच्या या चुकीमुळे मॅचच्या निकालावर परिणाम झाला आणि इंग्लंडला वर्ल्ड कप मिळाला.

ओव्हरथ्रोच्या या वादावर आजही अनेक क्रिकेटपटू आपली मतं मांडत आहेत. हा वाद सुरु असतानाच सचिन तेंडुलकरने एक व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना प्रश्न विचारला आहे.

सचिनने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये बॉलरने टाकलेला बॉल स्टम्पला लागतो. यानंतर बेल्स जमिनीवर पडत नाही, पण स्टम्पमध्येच अडकून राहते. बॉलिंग टीम याबाबत अंपायरकडे अपील करते, पण अंपायर नॉट आऊट देतो.

'एका मित्राने माझ्याकडे हा व्हिडिओ शेयर केला. ही खूप दुर्मिळ घटना आहे. तुम्ही अंपायर असतात तर काय निर्णय दिला असतात?' असा प्रश्न सचिनने चाहत्यांना विचारला.

सचिनने विचारलेल्या या प्रश्नाला मजेशीर उत्तरं आली. बॅट्समनला अटक झाली, पण तो जामिनावर सुटला, अशी प्रतिक्रिया एकाने दिली. बॅट्समन आऊट आहे, पण सध्याच्या नियमांमुळे त्याला जामीन मिळेल, असं एक यूजर म्हणाला.