'कुलदीपसारखाच धोनीही माझा मित्र'; टीम इंडियाच्या वातावरणावर विराटचं भाष्य

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियामध्ये फूट पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

Updated: Jul 25, 2019, 09:52 PM IST
'कुलदीपसारखाच धोनीही माझा मित्र'; टीम इंडियाच्या वातावरणावर विराटचं भाष्य title=

मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभव झाल्यानंतर टीम इंडियामध्ये फूट पडल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये गट निर्माण झाले असून टीममधले खेळाडू या दोन गटांमध्ये विभागले गेले असल्याचंही बोललं गेलं. पण या सगळ्या चर्चांवर आता खुद्द विराटने भाष्य केलं आहे. टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममधली वातावरण एकदम चांगलं असतं. खेळाडूवर ओरडण्याची पद्धत ड्रेसिंग रुममध्ये नाही. माझी कुलदीपसोबत जेवढी मैत्री आहे तेवढीच धोनीसोबतही आहे. कोणीही कोणाला काहीही बोलू शकतं, असं वातावरण टीममध्ये आहे, असं विराट म्हणाला. विराटने टाईम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली.

'मी स्वत: खेळाडूंकडे जातो आणि मी जी चूक केली ती तुम्ही करू नका, असं सांगतो. खेळाडूंनी त्यांचे विचार मांडण्याला मी प्राधान्य देतो. खेळाडूंना सशक्त बनवण्यावर माझा विश्वास आहे. खेळाडूंना कोणत्याही प्रकारची अडचण आली तर मी त्यांच्याशी बोलतो,' अशी प्रतिक्रिया कोहलीने दिली. 

'वर्ल्ड कपमध्ये झालेला पराभव पचवणं कठीण आहे. आम्ही खूप चुका केल्या नाहीत, तरी स्पर्धेच्या बाहेर झालो. जेव्हा तुम्ही चुका करता तेव्हा त्या पाहून तुम्ही मान्य करता, पण आम्ही मोठ्या चुका केल्या नाहीत,' असं वक्तव्य कोहलीने केलं.

'आयुष्यात आलेल्या अपयशाने खूप काही शिकवलं आहे. कठीण परिस्थितीमुळे मला पुढे जायला प्रेरित केलं. तसंच एक माणूस म्हणूनही या काळामुळे माझ्यात सुधारणा झाली,' असं विराटने सांगितलं. वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आपण उत्साहित आहोत, असं विराट म्हणाला.