Ind vs Aus: 'माझ्यासाठी हे फार सोपं नाही, पण...', दुसऱ्या कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'संघाच्या हितासाठी हे सर्वोत्तम'

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील (Ind vs Aus) दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. पहिल्या सामन्यात विश्रांती घेतलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) दुसऱ्या सामन्याआधी मोठा निर्णय घेतला आहे.   

शिवराज यादव | Updated: Dec 5, 2024, 06:13 PM IST
Ind vs Aus: 'माझ्यासाठी हे फार सोपं नाही, पण...', दुसऱ्या कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय, 'संघाच्या हितासाठी हे सर्वोत्तम' title=

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने दुसऱ्या कसोटी सामन्यात आपण मधल्या फळीत फलंदाजी करणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पहिल्या कसोटी सामन्याप्रमाणे के एल राहुल दुसऱ्या सामन्यातही आघाडीला फलंदाजीला येईल असं रोहितने सांगितलं आहे. शुक्रवापासून अॅडलेड येथे दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. रोहितने बाळाचा जन्म होणार असल्याने पहिल्या कसोटी सामन्यातून विश्रांती घेतली होती. पर्थमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराहकडे नेतृत्व सोपवण्यात आलं होतं. तसंच यशस्वीच्या सोबतीने के एल राहुलने पहिल्या क्रमांकावर फलंदाजी केली होती. पण आता रोहित शर्मा परतल्यानंतर के एल राहुलच्या फलंदाजीचा क्रमांक पुन्हा बदलले अशी शक्यता व्यक्त होत होती. पण रोहित शर्माने या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आपण पहिल्या क्रमांकावर फलंदाजी करणार नाही असं त्याने स्पष्ट केलं आहे. 

पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात के एल राहुलने यशस्वीच्या साथीने जबरदस्त खेळी केली होती. त्यांनी केलेल्या भागीदारीमुळे संघाला विजय मिळवणं सोपं झालं होतं. के एल राहुलने 77 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं की, "के एल राहुल फलंदाजीची सुरुवात करेल आणि मी मधल्या फळीत एखाद्या क्रमांकावर खेळेल. माझ्यासाठी हे फार सोपं नाही, पण संघासाठी सर्वोत्तम आहे".

दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने गुरुवारी त्याच्या बाजूने असमानतेच्या अफवांना पूर्णविराम दिला आणि संघामध्ये खूप चांगली भावना आहे असं म्हटलं. पर्थ कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या विधानामुळे ऑस्ट्रेलिया संघात फूट पडल्याच्या चर्चांना सुरुवात झाली. "तुम्हाला कदाचित हा प्रश्न फलंदाजांपैकी एकाला विचारावा लागेल. मी थोडा आराम करत आहे आणि फिजिओ, थोडे उपचार घेत आहेत. मी पुढच्या कसोटीकडे पाहत आहे आणि या फलंदाजांविरुद्ध काय योजना आखू शकतो याचा विचार करत आहे," असं तो म्हणाला.

सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेत बोलताना कमिन्सने सांगितलं की, संघ छान दिसत आहे आणि काही समालोचकांचं मत 100 टक्के चुकीचे आहे. संघासंबंधी अफवांवर जास्त वेळ घालवू नका असंही त्याने सांगितलं. 

"हो, टीम छान दिसत आहे. काही समालोचकांना ते 100 टक्के चुकीचे वाटले. आम्ही नेहमीप्रमाणे तयारी केली आहे आणि एकमेकांशी चांगले आहोत. संघाभोवती खूप छान भावना आहे. म्हणून आम्ही याची जास्त चिंता करत नाही," असं कमिन्स म्हणाला.

हेजलवूडचं विधान ऐकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा माजी स्टार खेळाडू अॅडम गिलक्रिस्ट याने फॉक्स स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, "यावरुन ड्रेसिंग रुममध्ये सर्व काही आलेबल नाही असं दिसत आहे. कदाचित मी जरा जास्त विचार करत असेन".

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने न्यूझीलंडविरोधात मालिका व्हाईटवॉशमधून जबरदस्त पुनरागमन केले. भारताने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव केला. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीची डे-नाईट ॲडलेड कसोटी 6 डिसेंबरपासून सुरू होणार आहे.