भारतीय टीमसोबत अनुष्का शर्मा, रोहित शर्मानं खरंच विरोध केला?

 लॉर्ड्सवर सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचआधी त्याआधी भारतीय टीमसाठी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयात भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Updated: Aug 9, 2018, 03:48 PM IST
भारतीय टीमसोबत अनुष्का शर्मा, रोहित शर्मानं खरंच विरोध केला? title=

मुंबई : लॉर्ड्सवर सुरु होणाऱ्या दुसऱ्या टेस्ट मॅचआधी त्याआधी भारतीय टीमसाठी लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांच्या कार्यालयात भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यानंतर बीसीसीआयनं या कार्यक्रमाचा एक फोटो शेअर केला. या फोटोवरून आता बीसीसीआयवर टीकेची झोड उठली आहे.

या फोटोमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा पुढच्या रांगेमध्ये उभी आहे. तर भारतीय टीमचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे शेवटच्या रांगेत उभा आहे. यामुळे सोशल नेटवर्किंगवरून बीसीसीआयवर टीका होत आहे.

अनुष्का शर्मा भारतीय टीमची सदस्य आहे का? हा फॅमीली फोटो नाही, टीम इंडियाचा फोटो आहे. दुसऱ्या क्रिकेटपटूच्या पत्नी या अधिकृत दौऱ्यावर नाहीत. भारताचा उपकर्णधार शेवटच्या रांगेमध्ये आणि भारतीय क्रिकेट टीमची पहिली महिला पहिल्या रांगेमध्ये... काही दिवसांपूर्वी हीच लोकं ऑनलाईन लेक्चर देत होती... अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ट्विटरवर येत आहेत.

अशाच प्रकारचं एक ट्विट करताना यूजरनं रोहित शर्माला टॅग केलं. रोहित शर्मामुळे जी जागा खाली झाली होती ती जागा अनुष्का शर्मानं भरली. खेळाडूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंडना तिसऱ्या टेस्ट मॅचपर्यंत खेळाडूंसोबत राहता येणार नाही, असा आदेश बीसीसीआयनं दिला होता. वेगळ्या खेळाडूंसाठी वेगळे नियम आहेत, असं ट्विट एका यूजरनं केलं होतं. रोहित शर्मानं हे ट्विट लाईक केलं आहे.

सहाव्या क्रमांकावर बॅटिंग करताना रोहित शर्माची सरासरी ५८.१९ आहे. सध्याच्या कोणत्याही खेळाडूपेक्षा ही सरासरी जास्त आहे, असं ट्विट एकानं केलं होतं. रोहित शर्मानं हे ट्विटही लाईक केलं आहे.

इंग्लंडविरुद्धची टी-२० आणि वनडे सीरिज संपल्यानंतर टेस्ट सीरिजसाठी रोहित शर्माची निवड करण्यात आली नाही. रोहितनं शेवटची टी-२० आणि पहिल्या वनडेमध्ये शतक झळकवलं होतं. तरीही रोहितला टीममध्ये स्थान देण्यात आलं नव्हतं. अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव टेस्टमध्येही रोहित शर्माला संधा देण्यात आली नव्हती. मी आता कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर पोहोचलो आहे जिकडे मी याचा विचार करणं सोडून दिलं आहे, अशी प्रतिक्रिया रोहितनं तेव्हा दिली होती.