Kolhapur Shocking News: प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं असं म्हटलं जातं. मात्र कोल्हापूरमध्ये प्रेम करुन लग्न करण्याची मोठी शिक्षा लग्न मंडपात उभ्या असलेल्या एका मुलीच्या कुटुंबाबरोबरच लग्नाला आलेल्या सर्वांना भोगावी लागली असती. सुदैवाने हा सारा प्रकार वेळीच लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या प्रकरणामधील मुख्य आरोपी हा नवरीचा मामाच असून पोलीस सध्या त्याच्या मागावर आहेत.
कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावामध्ये भाचीच्या लग्नाच्या स्वागत समारंभासाठी आयोजित करण्यात आलेल्या भोजनाच्या कार्यक्रमातीव जेवणात मामानेच विषारी औषध टाकल्याची घटना समोर आली आहे. ही माहिती समोर आल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीचं नाव महेश जोतीराम पाटील असं आहे. आरोपीने आपल्या भाचीच्या लग्नाच्या जेवणात विष का टाकलं याचं धक्कादायक कारण समोर आलं आहे
महेश या आरोपीचा भाचीच्या लग्नाला विरोध होता. आपल्या मर्जी विरोधात भाचीने लग्न केल्याचं महेशला आवडलं नव्हतं. मात्र आठवड्यापूर्वीच भाचीने गावातीलच मुलासोबत पळून जाऊन लग्न केल्याने बदनामीच्या रागातून महेशने हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. पळून जाऊन लग्न केलेल्या या मुलीच्या घरच्यांनी तिचं हे लग्न स्वीकारलं. या दोघांचा स्वीकार केल्यानंतर लग्नाच्या आठवडाभरानंतर घरच्यांनी गावकऱ्यांसाठी भोजन समारंभाचं आयोजन केलं होतं. मात्र या भोजन समारंभामधील जेवणात मुलीवरील राग काढण्यासाठी महेशने विषारी औषध टाकलं.
या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपी महेशचा शोध सुरु केला आहे. लग्नाच्या रिसेप्शननिमित्त आयोजित भोजन समारंभातील जेवणात विषारी औषढ टाकताना महेशला आचाऱ्याने पाहिल्याने त्याचा भांडाफोड झाला. त्यानंतर महेशने तिथून पळ काढला असून तो फरार आहे. आचाऱ्याने वेळीच हा सारा प्रकार पाहिल्याने एक मोठा अनर्थ टळला.