Mumbai Local Train Update: रेल्वे प्रशासनाने विनातिकिट प्रवास करणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. लवकरच रेल्वे प्रशासनाकडून दंडाची रक्कम वाढवण्यात येण्याची शक्यता आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेकडून तसा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाला दिला आहे. त्यामुळं येत्या काळात लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून दंडाची अधिक रक्कम वसूल करण्यात येऊ शकते.
रेल्वे प्रशासनाकडून लोकलमध्ये विनतिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात विशेष मोहिम राबवण्यात येते. दररोज हजारो प्रवासी विनातिकिट प्रवास करतात. त्यांच्याकडून वसुल करण्यात आलेल्या दंडाची रक्कमदेखील जास्त असते. या दंडाच्या रकमेतून रेल्वेला चांगला महसूलदेखील मिळतो. मात्र, या फुकट्या प्रवाशांना चाप बसावा यासाठी रेल्वेने आता कारवाई अधिक कठोर करण्याचा विचार केला आहे. सध्या रेल्वेकडून फुकट्या प्रवाशांकडून 250 रुपये दंड आकारण्यात येतो. मात्र लवकरच या दंडाच्या रकमेत वाढ होण्याची शक्यता आहे.
रेल्वे सध्या प्रवाशांकडून आकारत असलेल्या दंडाची रक्कम 250 रुपये आहे. सेकंड क्लास, फर्स्ट क्लास आणि एसी कोचसाठीही हिच रक्कम आकारली जाते. मात्र रेल्वे प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावानुसार, सेकंड क्लाससाठी 250 रुपये, फर्स्ट क्लाससाठी 750 रुपये आणि एसी लोकलसाठी 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात यावा असं नमूद केलं आहे. तसंच, लंबा पल्ल्याच्या ट्रेनसाठी जितका दंड आकारला जातो त्यावर अतिरिक्त 5 टक्के जीएसटीदेखील आकारण्यात यावा, असंदेखील प्रस्तावात म्हणण्यात आलं आहे.
फर्स्ट क्लास आणि एसी कोचमधून विनातिकिट प्रवास करणाऱ्यांकडून 250 रुपये, तिकिटाचे पैसे आणि अतिरिक्त जीएसटीदेखील आकारण्यात येईल. रेल्वेच्या नव्या प्रस्तावात विविध श्रेणीनुसार दंड आकारण्याची शिफारस केली आहे. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यानंतरच हा नियम लागू होणार आहे.
विनातिकिट प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत असल्याने रेल्वेने हा निर्णय घेतला आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, लांब पल्ल्याच्या ट्रेनसाठी सध्या दंड आकारण्याची प्रक्रिया आधीपासूनचे वेगवेगळी आहे. 3AC, 2AC आणि 1 AC कोचसाठी वेगवेगळे दंड आकारण्यात येत आहे. यात दंडाची रक्कम, तिकिटाची रक्कम आणि जीएसटीदेखील आकारण्यात येते.