Rishabh Pant: 5 जून रोजी टीम इंडियासाठी टी-20 वर्ल्डकपच्या मिशनला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडशी असून त्यापूर्वी बांगलादेश विरूद्ध झालेल्या वॉर्म अप सामन्यात भारताचा विजय झालाय. वॉर्म अप सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशाचा 60 रन्सने पराभव केला. या सामन्यात दीर्घकाळाने टीम इंडियासाठी मैदानात उतरलेल्या ऋषभ पंतने उत्तम कामगिरी केली. मात्र या सामन्यात आऊट न होता देखील पंतला पव्हेलियनमध्ये परतावं लागलं होतं. हे नेमकं प्रकरणं काय आहे ते पाहूयात.
बांगलादेश विरूद्धच्या वॉर्म अप सामन्यात ऋषभ पंतने 32 बॉल्समध्ये 53 रन्स करत शानदार अर्धशतक झळकावलं. पंतने आपल्या खेळीत 8 चौकार मारले ज्यात 4 षटकारांचा समावेश होता. मात्र यावेळी एक अशी घटना घडली ज्यामुळे सामना पाहणारे सर्व आश्चर्यचकित झाले होते. ही घटना म्हणजे पंतला विकेट न गमावता मैदान सोडावे लागले. पंतने अर्धशतक झळकावताच तो लगेच पॅव्हेलियनच्या दिशेने धावला.
टीम इंडिया व्यवस्थापनाने ठरवलं होतं की, जर एखाद्या खेळाडूने अर्धशतक केलं तर त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागेल. पंतच्या बाबतीतही असंच घडलं. त्यामुळे पंतचं अर्धशतक होताच त्यानंतर शिवम दुबे मैदानावर उतरला. इतर फलंदाजांना जास्तीत जास्त वेळ मिळावा यासाठी टीम इंडियाने हा निर्णय घेतला होता.
वॉर्म अप सामन्यात पंत रिटायर्ड आऊट झाला. यावेळी पंतने उत्तम फटकेबाजी केली. न्यूयॉर्कच्या खेळपट्टीवर जिथे संजू सॅमसन आणि रोहित शर्माला फलंदाजी करण्यास अडचण येत होती त्याच ठिकाणी पंतने अप्रतिम शॉट्स खेळले. पंत तिसऱ्या क्रमांकावर मैदानात उतरला होता. तर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याला मैदानात फलंदाजीसाठी उतरावं लागलं. पाचव्या ओव्हरमध्ये ऋषभ पंतने शकीब अल हसनला तीन षटकार ठोकले. याशिवाय पंतच्या स्वीप आणि रिव्हर्स स्वीप शॉट्समुळे गोलंदाजांच्या लाईन लेंथवर परिणाम झाला.
ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या अर्धशतकी खेळीसह प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याचं स्थान पक्कं केलं आहे. या खेळाडूच्या जागी संजू सॅमसनला संधी मिळणार का असा प्रश्न उपस्थित होत होता. मात्र वॉर्म अप सामन्यात पंतचा खेळ चांगला झाला. यावेळी संजू सॅमसनला केवळ 1 रन करता आला. आता 5 जूनला होणाऱ्या आयर्लंडविरुद्धच्या सामन्यात कोणाला संधी मिळणार हे पहावं लागणार आहे.