Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा?

Rohit Sharma Statement : वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले.

सुरभि जगदीश | Updated: Jun 2, 2024, 07:37 AM IST
Rohit Sharma: आम्ही ठरवलेलं नाही की....; वॉर्म-अप सामन्यानंतर फलंदाजीविषयी काय म्हणाला रोहित शर्मा? title=

Rohit Sharma Statement : टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून टीम इंडियासाठी या मिशनची सुरुवात 5 जूनपासून होणार आहे. या टूर्नामेंटमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना आयरलँडशी होणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाने बांगलादेशसोबत वॉर्म-अप सामना खेळला असून या सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने एकमेव सराव सामन्यात बांगलादेशचा 60 रन्सने पराभव केला. दरम्यान या विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आनंदी असल्याचं दिसून आलं. 

वॉर्म अप सामन्यात विजय मिळवल्यानंतर रोहित शर्माने टीममधील खेळाडूंचं कौतुक केलं आहे. रोहितने ऋषभ पंत आणि अर्शदीप सिंग यांच्या कामगिरीचे कौतुक केलंय. ऋषभ पंतने या सामन्यात फलंदाजी करताना 4 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 53 रन्स केले. त्याचवेळी अर्शदीप सिंगने चांगली गोलंदाजी केली. 

वॉर्म अप सामन्यातील विजयानंतर काय म्हणाला रोहित?

विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला, 'ज्याप्रकारे आजच्या सामन्यात गोष्टी घडल्या त्यामुळे मी खूप खूश आहे. आम्हाला सामन्यातून जे हवे होते ते आम्हाला मिळाले. मी टॉसच्या वेळी म्हटल्याप्रमाणे परिस्थितीशी जुळवून घेणं महत्त्वाचे होतं. नवीन ठिकाण, नवीन मैदान, ड्रॉप-इन पीच या सर्वांची सवय करून घेणं महत्त्वाचे होतं. आम्ही त्यात चांगले काम केले.

दिर्घकाळानंतर कमबॅक करणाऱ्या पंतचं रोहितकडून कौतुक

या सामन्यात टीम इंडियाचा विकेटकीपर ऋषभ पंतने बऱ्याच काळानंतर कमबॅक केलं होतं. रोहित शर्मानेही ऋषभ पंतच्या फलंदाजीचे कौतुक केलं. विराटच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं होतं. पंतविषयी बोलताना रोहित शर्मा म्हणाला, 'फक्त त्याला संधी द्यायची होती. आम्ही ठरवलेलं नाही की, फलंदाजी युनिट कशी असेल. गोलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. टीममधील प्रत्येकाने ज्या पद्धतीने कामगिरी केली त्यामुळे मी आनंदी आहे.

रोहितने अर्शदीपच्याही गोलंदाजीवर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, 'त्याने आम्हाला दाखवून दिलं आहे की, तो खेळलेल्या प्रत्येक सामन्यात त्याच्यात प्रतिभा आहे. त्याने खूप चांगली डेथ बॉलिंग केली. यावेळी समोरून चेंडू स्विंग केला आणि नंतर मागच्या टोकाला गोलंदाजी केली. टीम कॉम्बिनेशन रोहित म्हणाला, 'आमच्याकडे 15 चांगले खेळाडू आहेत. परिस्थिती काय आहे हे पाहावे लागणार आहे.