Crime News Badlapur Sexual Assault: बदलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका 19 वर्षीय तरुणीवर रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे साऱ्या प्रकरणामध्ये पीडितेच्या मैत्रिणीचाही सहभाग आहे. पीडितेच्या मैत्रिणीने आधी तिला बियर पाजली आणि तिची शुद्ध हरपल्यानंतर या मैत्रिणीच्या रिक्षाचालक मित्राने पीडितेवर अत्याचार केला. या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही मूळची मुंबईची रहिवाशी आहे. ही तरुणी 21 डिसेंबर रोजी बदलापूरला तिच्या जवळच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी बदलापूरच्या या मैत्रिणीने दत्ता जाधव या तिच्या रिक्षाचालक मित्रालाही सोबत बोलावून घेतलं आणि या तिघांनी मद्यपान केलं. मद्यपान केल्यानंतर पीडित तरुणी शुद्धीत नसल्याचा गैरफायदा घेत रिक्षाचालक दत्ता जाधवने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित तरुणीच्या मैत्रिणीनेही या कृत्यात त्याची साथ दिल्याची माहिती समोर आली आहे.
पीडित तरुणी शुद्धीत आल्यानंतर आपल्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं तिच्या लक्षात आलं. याप्रकरणी तिने 23 डिसेंबर रोजी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि अवघ्या 12 तासात नराधम रिक्षाचालक दत्ता जाधवला अटक केली दत्ता जाधवला खरवई परिसरातून बेड्या ठोकण्यात आल्या. पोलीस दत्ता जाधवला अटक करण्यासाठी गेले, त्यावेळेस पोलिसांच्या भीतीने तो बहिणीच्या घरातील लोखंडी कपाटात लपून बसला होता. मात्र पोलिसांनी अतिशय शिताफिने त्याला शोधून काढत बेड्या ठोकल्या.
दत्ता जाधवला या कृत्यात साथ देणारी त्याची आणि पिडितेची कॉमन फ्रेंड असलेल्या तरुणीलाही पोलिसांनी अटक केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांनी दिली आहे.
दरम्यान, शुक्रवारी पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महिलांवरी अत्याचाराच्या घटनांवर भाष्य केलं. "या सर्व घटनांचा मी निषेध करते. केंद्र सरकारने जे कायदे आणले आहेत त्याच्यानुसार आता कडक कारवाई होईल," असं अदिती तटकरे म्हणाल्या. "मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घातलं आहे," असंही कॅबिनेट मंत्री असलेल्या अदिती तटकरेंनी सांगितलं.