2024 चा शेवटचा रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणार! शुक्रवारी रात्रीच दिसला ट्रेलर

Last Sunday of 2024 Will Be Difficult For Mumbaikar: थर्टी फस्टच्या तयारीत असलेल्या मुंबईकरांचं टेन्शन रविवारी अधिक वाढणार असल्याची चिन्हं दिसत आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 28, 2024, 07:07 AM IST
2024 चा शेवटचा रविवार मुंबईकरांचं टेन्शन वाढवणार! शुक्रवारी रात्रीच दिसला ट्रेलर title=
रविवार वाढवणार मुंबईकरांचं टेन्शन (फाइल फोटो, सौजन्य - रॉयटर्स)

Last Sunday of 2024 Will Be Difficult For Mumbaikar: मुंबईकरांसाठी 2024 चा शेवटचा रविवार त्रासदायक ठरणार आहे.मध्य रेल्वेवर रविवारी तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मुख्य मार्गाबरोबरच हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे वर्षाच्या शेवटच्या रविवारचा आनंद घेण्याच्या उद्देशाने किंवा अन्य कारणाने प्रवासासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांचा मेगा ब्लॉकमुळे ब्रेक लागलेल्या रेल्वेकडून खोळंबा होणार हे निश्चित आहे.

मुख्य मार्गावरील मेगा ब्लॉक कसा असणार?

रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) ते विद्याविहारदरम्यान सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी साडेतीन वाजेपर्यंच्या कालावधीत अप आणि डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटीवरून सुटणाऱ्या डाऊन धिम्या सेवा विद्याविहारपर्यंत डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत.

हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक कसा असणार?

सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंतच्या कालावधीत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान पोर्टलाईन वगळून अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवेवर परिणाम होणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पनवेलवरून ठाण्याकडे जाणाऱ्या अप आणि ठाण्यावरून पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स हार्बर मार्गावरील बंद राहतील.

मेगा ब्लॉकच्या कालावधीत सीएसएमटी मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येणार आहे. तसेच ठाणे- वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स हार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. यासोबतच बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल. पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहणार आहेत.

पश्चिम रेल्वेवर मध्यरात्रीनंतर मेगा ब्लॉक

लोअर परळ रेल्वे स्थानकात दोन्ही जलद मार्गिकांवर इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी शनिवारी रात्री 11.30 वाजल्यापासून पहाटे साडेचारदरम्यान पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल ते माहीम स्टेशनदरम्यान जलद मार्गावरील गाड्या धीम्या मार्गावर वळविण्यात येतील.लोकलच्या परिचालनासाठी कंप्युटराइज्ड इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम बसविण्यात येत असल्याने पॉईंट फेल्युअर, सिग्नलिंग यंत्रणेतील बिघाड, उपकरणांची वारंवार करावी लागणारी देखभाल-दुरुस्ती इत्यादी घटनांचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने हे काम अत्यंत महत्त्वाचं आहे. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने नवी सिस्टम महत्त्वपूर्ण झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. पूर्वी रेल्वेचे ट्रॅक बदलण्यासाठी ट्रॅकवर थांबून कर्मचारी लोखंडी लिव्हरची मदत घेत असत. त्यानंतर इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग सिस्टम आल्याने बटणांद्वारे हे काम होऊ लागले. आता इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टमचा वापर सुरू झाला आहे. या यंत्रणेमुळे मानवी हस्तक्षेप कमी होऊन कॉम्प्युटरवर प्रोग्रॅमद्वारे गाड्यांचे परिचालन करण्यास मदत होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

प्रवाशांना शुक्रवारी करावी लागली तंगडतोड

रविवारी उडणाऱ्या गोंधळाचा ट्रेलर मुंबईकरांना शुक्रवारी रात्रीच पाहायला मिळाला. शुक्रवारी रात्री 11 वाजून 25 मिनिटानंतर महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड आणि माहीम स्टेशनवरून विरार आणि बोरिवलीसाठी प्रवाशांना लोकल उपलब्ध झाल्या नव्हत्या. परिणामी सेकंड शिफ्ट करून घरी जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला. त्यांना लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागली. या प्रवाशांना लोकल पकडण्यासाठी मुंबई सेंट्रल आणि दादर स्टेशनवर जावे लागले.