रविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद? आगरकर स्पष्टपणे म्हणाला, 'त्याला वगळण्यात..'

Ajit Agarkar On Ravindra Jadeja Dropped: विराट कोहली आणि रोहित शर्माला श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय संघात स्थान देण्यात आलं असलं तरी वगळण्यात आलेल्या खेळाडूंमधील सर्वात मोठं नाव हे रविंद्र जडेजाचं आहे. याबद्दल आगरकर काय म्हणाला आहे पाहा

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 22, 2024, 11:31 AM IST
रविंद्र जडेजासाठी भारतीय संघाची दारं कायमची बंद? आगरकर स्पष्टपणे म्हणाला, 'त्याला वगळण्यात..' title=
पत्रकरांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं भाष्य

Ajit Agarkar On Ravindra Jadeja Dropped: भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी लवकरच रवाना होणार आहे. त्यापूर्वी भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी लागलेल्या गौतम गंभीरने निवड समितीचा प्रमुख असलेल्या अजित आगरकरने पत्रकारांशी संवाद साधला. गौतम गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारतीय संघ पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर जात आहे. या मालिकेसाठी केलेली संघ निवड सध्या तुफान चर्चेत असून या संघनिवडीसंदर्भातील अनेक शंकांना गंभीर आणि आगरकरने उत्तरं दिली आहेत. विशेष म्हणजे या दौऱ्यात डावलण्यात आलेल्या क्रिकेटपटूंमध्ये भारताचा अष्टपैलू खेळूड रविंद्र जडेजाचाही समावेश आहे. गंभीर प्रशिक्षक झाल्याने जडेजासाठी संघाची दारं कायमची बंद झाली की काय अशी शंकाही घेतली जात आहे. मात्र जडेजाला वगळण्यात आलं आहे की त्याला आराम देण्यात आला आहे यासंदर्भात बीसीसीआयकडून अजित आगरकरने पत्रकारांशी बोलताना खुलासा केला आहे.

जडेजाला स्थान मिळायला हवं होतं

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट संघातून भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजालाही का वगळण्यात आलं याबद्दल आगरकर मोकळेपणे बोलला. रविंद्र जडेजाने भारताने टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणे अंतरराष्ट्रीय टी-20 मधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे टी-20 संघात नाही रोहित शर्मा आणि विराट कोहलीप्रमाणे एकदिवसीय संघात तरी जडेजाला स्थान मिळायला हवं होतं असं चाहत्यांचं तसेच काही आजी-माजी क्रिकेटपटूंचं म्हणणं होतं. मात्र आता जडेजासंदर्भातील भूमिका बीसीसीआयने स्पष्ट केली आहे.

...म्हणून रविंद्र जडेजाला वगळलं

पत्रकारांनी जडेजाबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना निवड समितीचा प्रमुख म्हणून अजित आगरकरने, "ज्या प्रत्येक खेळाडूला वगळण्यात आलं आहे त्याला वाईट वाटणार. मात्र अनेकदा याला पर्याय नसतो. सर्वांना 15 मध्ये स्थान देणं शक्य होत नाही. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करण्याचा हा सारा खेळ आहे. रिंकूला टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं नाही यात त्याचा काही दोष नाही. अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या दोघांनाही संघात स्थान देण्यात अर्थ नव्हता. त्यातही ही मालिका फारच छोटी आहे. त्याला वगळण्यात आलेलं नाही. त्याचा विचार भविष्यातील कसोटी मालिकेसाठी केला जाईल. अजूनही तो फार महत्त्वाचा खेळाडू असून भविष्यात त्याचा नक्कीच विचार होणार आहे," असं स्पष्टपणे सांगितलं. 

नक्की वाचा >> ...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली

श्रीलंकन दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ: 

रोहित शर्मा (कर्णधार)
शुभमन गिल (उपकर्णधार)
विराट कोहली
के. एल. राहुल (विकेटकीपर)
ऋषभ पंत (विकेटकीपर)
श्रेयस अय्यर
रियान पराग
शिवम दुबे
कुलदीप यादव,
वॉशिंग्टन सुंदर
अक्षर पटेल
मोहम्मद सिराज
अर्शदीप सिंग
खलील अहमद
हर्षित राणा

नक्की वाचा >> 'कार्ल्सनने मला 6 बॉलमध्ये 24 धावा मारल्यावर रोहित जवळ आला अन् म्हणाला...'; अक्षर पटेलचा खुलासा

श्रीलंकन दौऱ्यातील टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ: 

सूर्यकुमार यादव (कर्णधार)
शुभमन गिल (उपकर्णधार)
यशस्वी जयस्वाल
रिंकू सिंग
रियान पराग
ऋषभ पंत (विकेटकीपर)
संजू सॅमसन (विकेटकीपर)
हार्दिक पांड्या
शिवम दुबे
अक्षर पटेल
वॉशिंग्टन सुंदर
रवी बिश्नोनी
अर्शदीप सिंग
खलील अहमद
मोहम्मद सिराज