...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली

Ajit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: प्रत्यक्ष अजित आगरकरनेच या प्रश्नाचं अगदी बेधडकपणे आणि स्पष्ट शब्दांमध्ये पत्रकार परिषदेत उत्तर दिलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jul 22, 2024, 11:19 AM IST
...म्हणून आम्ही हार्दिकऐवजी सूर्याला कॅप्टन केलं; आगरकरने पत्रकारांसमोर कारणांची यादीच वाचली title=
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केलं विधान

Ajit Agarkar On Why Suryakumar Yadav Over Hardik Pandya: संपूर्ण देश ज्या उत्तराची आतुरतेने वाट पाहत होता ते उत्तर अखेर भारतीय क्रिकेटच्या निवड समितीच्या प्रमुखपदी असलेल्या अजित आगरकरने दिलं आहे. भारतीय संघ गौतम गंभीरच्या प्रशिक्षणाअंतर्गत पहिल्यांदाच करत असलेल्या परदेश दौऱ्याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आगरकरने टी-20 संघामध्ये कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याला डच्चू देत त्याच्या जागी सूर्यकुमार यादवची निवड का करण्यात आली याबद्दलचा खुलासा केला आहे. अजित अगरकरबरोबरच या पत्रकार परिषदेला नवनियुक्त प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित होता. 

या कारणामुळे हार्दिकऐवजी लागली सूर्यकुमारची वर्णी

हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून का निवडलं? असा प्रश्न विचारण्यात आला असता आगरकरने निवड समितीला नेमकं काय अपेक्षित होतं हे सांगितलं. हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यासंदर्भातील निर्णय का घेतला याविषयी बोलताना आगकरकरने, "आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व समाने खेळू शकेल. ज्याच्यासारखं कौशल्यं सापडणं कठीण आहे असा कर्णधार आम्ही शोधत होतो. त्याच्यासाठी (हार्दिकसाठी) आरोग्य संभाळणं आव्हानात्मक झालं आहे. त्यामुळे प्रशिक्षक आणि निवड समितीला त्याच्या पाठीशी उभं राहणं कठीण झालं. पुढील टी-20 वर्ल्ड कपपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. त्याची फिटनेस हे मुख्य आव्हान आहे हे स्पष्टचं आहे. आम्हाला असं कोणीतरी हवं आहे जो बराच काळ उपलब्ध असेल. सूर्यामध्ये ते सर्व गुण आहेत जे एक कर्णधार होण्यासाठी आवश्यक आहेत," असं स्पष्टपणे सांगितलं.

घडलं भलतच

भारत विरुद्ध श्रीलंकेदरम्यानच्या टी-20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी दोन वेगवेगळ्या संघाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने केली. या माहिन्यामध्येच होणाऱ्या या मालिकेपासून भारतीय क्रिकेटमधील एका नवीन अध्यायाला सुरुवात होणार आहे. गौतम गंभीरच्या प्रशिक्षणामध्ये पहिल्यांदाच भारतीय संघ परदेश दौरा करणार आहे. गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर पहिल्यांदाच निवडण्यात आलेल्या संघावर गंभीरचा प्रभाव स्पष्टपणे दिसतोय. टी-20 साठी निवडण्यात आलेल्या संघाचं कर्णधारपद तर सर्वांनाच धक्का देमारं ठरलं. टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र घडलं काहीतरी वेगळच! मात्र आता हा वेगळा निर्णय का घेण्यात आला यासंदर्भातील खुलासा खुद्द आगरकरनेच केला आहे.