नवी दिल्ली : क्रिकेट विश्वात अनेक रेकॉर्ड्स घडत असतात. टी-२० क्रिकेटमध्ये तर रेकॉर्ड्सचा पाऊसच पडत असतो. हरणारी टीम कधी मॅच जिंकते हे कळतही नाही तर जिंकणारी टीम कधीही हरू शकते.
टी-२० क्रिकेटमध्ये कुठला खेळाडू हीट ठरेल आणि कुठला फ्लॉप याचा अंदाजही लावता येणं कठीण आहे. टी-२० क्रिकेटमध्ये अनेक अजब-गजब रेकॉर्ड्स बनत असतात. असाच एक रेकॉर्ड भारतीय क्रिकेटरने केला आहे. त्याने केलेला हा रेकॉर्ड जगातील कुठल्याच क्रिकेटरला अद्याप जमलेला नाहीये.
टीम इंडियाचा माजी कोच अनिल कुंबळे याने पाकिस्तान विरोधात एका इनिंगमध्ये १० विकेट्स घेतले होते. एका इनिंगमध्ये १० विकेट्स घेणारा अनिल कुंबळे हा दुसरा क्रिकेटर बनला होता. त्यापूर्वी हा रेकॉर्ड जिम लेकरने १९५६ साली केला होता.
टेस्ट क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये १० विकेट्स घेणं फार मोठी गोष्ट नाहीये. अनेक क्रिकेटर्स हा कारनामा करतात. मात्र, वन-डे आणि टी-२० क्रिकेटमध्ये १० विकेट्स घेणं अशक्य मानलं जातं. पण, राजस्थानमधील एका १५ वर्षीय तरुणाने हा कारनामा करुन दाखवला आहे.
राजन्सथानमधील आकाश चौधरी याने स्थानिक टी-२० क्रिकेटमध्ये दिशा क्रिकेट अकॅडमीतर्फे खेळताना १० विकेट्स घेतले आहेत. स्व. भवेर सिंह टी-२० टूर्नामेंटमध्ये पर्ल अकॅडमी विरोधात खेळताना आकाशने हा रेकॉर्ड केला आहे.
पर्ल अकॅडमीने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला त्यानंतर दिशा क्रिकेट अकॅडमीने २० ओव्हर्समध्ये १५६ रन्स केले. या स्कोरचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पर्लच्या टीमला आकाशच्या बॉलिंगने गारद करत केवळ ३६ रन्सवर आऊट केलं.
पहिल्या ओव्हरमध्ये आकाशने दोन विकेट्स घेतले. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये पून्हा दोन विकेट्स घेतले. त्यानंतर चौथ्या आणि शेवटच्या ओव्हरमध्ये चार विकेट्स घेतले. शेवटच्या ओव्हरमध्ये आकाशने हॅटट्रिकही घेतली. इतकेच नाही तर, आकाशने हे सर्व दहा विकेट्स एकही रन न देता घेतले आहेत.