'त्याला बॉलिंग येत नाही अन् बॅटिंगही मग...'; World Cup च्या संघात 'ते' नाव पाहून श्रीकांत संतापले

ODI World Cup 2023 Srikanth Angry: ऑक्टोबर महिन्यामध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा मंगळवारी करण्यात आली. भारतीय संघामध्ये 15 खेळाडूंचा समावेश आहे. मात्र यातील एक नाव एस. श्रीकांत यांना फार खटकलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 6, 2023, 01:08 PM IST
'त्याला बॉलिंग येत नाही अन् बॅटिंगही मग...'; World Cup च्या संघात 'ते' नाव पाहून श्रीकांत संतापले title=
भारतीय संघामध्ये एकूण 15 खेळाडूंचा समावेश आहे

ODI World Cup 2023 Srikanth Angry: विश्वचषक स्पर्धेसाठी मंगळवारी भारतीय संघाची घोषणा झाली. भारताच्या संघामध्ये 15 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. निवड समितीचे प्रमुख असलेल्या अजीत आगरकर यांनी पत्रकारपरिषद घेऊन संघाची घोषणा केली. भारतीय संघामधून संजू सॅमसन, युजवेंद्र चहल यासारख्या खेळाडूंना बाहेर ठेवण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरी मागील 4 महिन्यांपासून मैदानापासून दूर असलेल्या के. एल. राहुलबरोबरच श्रेयस अय्यर आणि इतर खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. मात्र या 15 जणांच्या संघात एका खेळाडूचं नाव पाहून माजी क्रिकेटपटू कृष्णामाचारी श्रीकांत यांनी संताप व्यक्त केला आहे. हा खेळाडू ना गोलंदाजी नीट करत ना फलंदाजी नीट करत त्याला संघात कशासाठी घेतलं आहे? असा थेट प्रश्नच श्रीकांत यांनी उपस्थित केला आहे. 

कोण आहे हा खेळाडू?

श्रीकांत यांनी ज्या खेळाडूच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे त्याचं नाव आहे, शार्दुल ठाकूर! भारताने शार्दुल ठाकूरला संघात स्थान देऊन मोठी चूक केली आहे असं श्रीकांत यांनी म्हटलं आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना श्रीकांत यांनी शार्दुल ना धड फलंदाजी करत ना गोलंदाजी तरी त्याला संघात घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. "सर्वजण सांगत आहेत की आठव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा एकजण हवा. 8 व्या क्रमांकावर कोणत्या संघाला फलंदाजाची गरज असते? शार्दुल ठाकूर तिथे खेळून केवळ 10 धावा बनवतोय. त्याला योग्य पद्धतीने फलंदाजीही करता येत नाही. तो पूर्ण 10 ओव्हर गोलंदाजीही करत नाही. तुम्ही नेपाळविरुद्धचा सामना पाहा. त्याने किती ओव्हर गोलंदाजी केली? केवळ 4. झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्धची त्याची कामगिरी पाहू नका," अशी टीका श्रीकांत यांनी केली आहे.

त्याला महत्त्व देण्याची गरज नाही

"तो (शार्दुल) चांगली कामगिरी करत असेल तर त्याचा विचार करावा. त्याला इतकं महत्त्व देण्याची गरज नाही. तुम्ही न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची कामगिरी पाहा. त्यामुळेच मी म्हणतोय की एकंदरित सरासरी पाहून तुम्ही लोकांना वेड्यात काढू नका. तुम्ही प्रत्येक सामन्यातील कामगिरी पहायला हवी," असंही पुढे बोलताना श्रीकांत यांनी सांगितलं. 

नक्की वाचा >> बाबो..! 'हा' देश वर्ल्डकपसाठी पाठवतोय 10 बॉलर्स असलेला संघ; 8 Oct ला भारताविरुद्ध सामना

त्याची कामगिरी कशी?

शार्दुलने मागील 10 डावांमध्ये 51 धावा केल्या आहेत. त्याला 10 पैकी 6 डावांमध्ये फलंदाजीची संधी मिळाली. शार्दुलची सर्वोत्तम धावसंख्या 25 होती. विकेट्सबद्दल बोलायचं झालं तर त्याने एकूण 18 विकेट्स घेतल्या आहेत. 4 विकेट्स त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध घेतल्यात. शार्दुलच्या गोलंदाजीचा संघाला फायदा होताना दिसतोय. मात्र त्याला फलंदाजीचा संघाला विशेष फायदा होत नाही. पार्टनरशीप तोडण्यासाठी शार्दुल हा हुकूमी एक्का असल्याचं समजलं जातं. मात्र श्रीकांत यांना असं वाटत नाही.

नक्की वाचा >> 'त्याला देशाबद्दल काहीच वाटत नाही'; मुलाच्या जन्मावरुन बुमराहवर सडकून टीका; धोनीचं मात्र कौतुक

वर्ल्डकपसाठीचा भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार ), के. एल. राहुल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव