मुंबई : महिला क्रिकेटपटूंसोबत झालेला भेदभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. मलेशियामध्ये सुरु असलेल्या टी-20 आशिया कपमध्ये भारताचा शानदार विजय झाला. भारतानं मलेशियाचा फक्त २७ रनवर ऑल आऊट केला. या मॅचमध्ये ९७ रनची खेळी करणाऱ्या कर्णधार मिताली राजला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. पण मॅन ऑफ द मॅच म्हणून मिळालेल्या रकमेमुळे क्रिकेट चाहते चांगलेच भडकले. मिताली राजला २५० डॉलर म्हणजेच १७ हजार रुपयांचं इनाम देण्यात आलं.
जगातलं सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असणारी बीसीसीआय आयपीएलचं आयोजन करते. यावेळी खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडला जातो. आयपीएलच्या प्रत्येक मॅचवेळी परफेक्ट कॅच, नई सोच अवॉर्ड, सुपर स्ट्रायकर, स्टायलिश प्लेअर आणि मॅन ऑफ द मॅच एवढे पुरस्कार देण्यात येतात. या प्रत्येक पुरस्काराची किंमत १ लाख म्हणजेच सगळ्या पुरस्काराची किंमत ५ लाख रुपये एवढी असते. पण महिला क्रिकेटपटूंची बोळवण फक्त १७ हजार रुपयांमध्येच का असा सवाल उपस्थित केला जात आहे. पुरस्कार देत आहात का भीक देत आहात. ही काय मस्करी आहे. हे क्लब क्रिकेट नसून आंतरराष्ट्रीय क्रिकेट आहे. हा अपमान बंद करा, अशा कठोर प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
आयपीएलच्या प्ले ऑफआधी दुपारी भर उन्हात बीसीसीआयनं महिलांच्या टी-20 मॅचचं आयोजन केलं होतं. या मॅचमध्ये जगभरातल्या महिला क्रिकेटपटू सहभागी झाल्या होत्या. या मॅचमध्ये महिला क्रिकेटपटूंना योग्य किटही देण्यात आली नव्हती. जर्सीच्या रंगासारखाच पॅड आणि हेल्मेटचा रंग असावा म्हणून पॅड आणि हेल्मेटला गुलाबी रंगाचा टॉवेल लावण्यात आला होता. यावरही चाहत्यांनी टीका केली होती.