लंडन : इंग्लंड आणि भारतामध्ये २००२ साली झालेली नॅटवेस्ट सीरिजची फायनल लक्षात नाही असा एकही क्रिकेट रसिक नसेल. या मॅचमध्ये युवराज सिंग आणि मोहम्मद कैफ यांच्या शानदार खेळीमुळे भारतानं ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयानंतर भारताचा कर्णधार सौरव गांगुलीनं लॉर्ड्सच्या बालकनीमध्ये टी शर्ट काढून सेलिब्रेशन केलं होतं. इंग्लंडचा खेळाडू एन्ड्र्यू फ्लिंटॉफनं मुंबईमध्ये केलेल्या सेलिब्रेशनचा बदला सौरव गांगुलीनं लॉर्ड्सच्या मैदानात घेतला होता. आता गांगुलीनं १६ वर्षानंतर या आठवणींना उजाळा दिला आहे. गौरव कपूर याच्या ब्रेकफास्ट विथ चॅम्पियनमध्ये गांगुलीनं टी शर्ट काढण्याबद्दलच्या प्रसंगाचं वर्णन केलं.
लक्ष्मण माझ्या उजव्या बाजूला उभा होता आणि हरभजन मागे उभा होता. जेव्हा मी टी- शर्ट काढत होतो तेव्हा लक्ष्मणनं मला रोखलं आणि अस करू नकोस म्हणाला. पण मी त्याचं ऐकलं नाही. मागे हरभजन उभा होता. मी शर्ट काढल्यानंतर मी काय करू असं हरभजननं विचारलं, तेव्हा तू पण टी-शर्ट काढं असं त्याला सांगितल्याचं सौरव गांगुली म्हणाला.
टी-शर्ट काढण्याचा विचार माझ्या डोक्यात अचानक आला. इंग्लंड भारत दौऱ्यावर असताना वनडे सीरिज ३-३नं बरोबरीत होती. यानंतर मुंबईच्या मॅचमध्ये इंग्लंडचा विजय झाला आणि फ्लिंटॉफनं टी-शर्ट काढून सेलिब्रेशन केलं. आता आपणही त्यांच्याच जमिनीवर अशाप्रकारे सेलिब्रेशन करावं असं मला वाटलं. पण केलेल्या प्रकाराबद्दल नंतर मलाच लाज वाटली, अशी प्रतिक्रिया गांगुलीनं दिली. क्रिकेटमध्ये असं करणं गरजेचं असतं का? तुम्ही असं का केलंत? असे प्रश्न माझ्या मुलीनं मला विचारले. तेव्हा ती माझी चूक होती, असं गांगुली म्हणाला.