लंडन : भारत आणि इंग्लंडमध्ये १ ऑगस्टपासून ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होत आहे. आत्तापर्यंत इंग्लंडमध्ये भारताचं रेकॉर्ड खराब राहिलं आहे. भारतानं इंग्लंडमध्ये १७ टेस्ट सीरिज खेळल्या आहेत. यातल्या फक्त ३ वेळा भारताला सीरिज जिंकता आली. तर १३ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडच्या जमिनीवर भारताच्या बड्या बड्या बॅट्समनना अपयश आलं. मागच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विराट कोहलीलाही अपयश आलं. पण मुरली विजय मात्र भारताच्या त्या दौऱ्यातला सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता.
२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यात मुरली विजयनं ५ टेस्ट मॅचमध्ये ४०.२० च्या सरासरीनं ४०२ रन केले होते. यामध्ये एका शतकाचा समावेश होता. या दौऱ्यामध्ये विराट कोहली, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा यांना चमकदार कामगिरी करता आली नाही. अजिंक्य रहाणेनं मागच्या दौऱ्यात ५ टेस्ट मॅचमध्ये २९९ रन केल्या होत्या. यात एक शतकही होतं.
इंग्लंडच्या मागच्या दौऱ्यातली मुरली विजयची कामगिरी बघता या दौऱ्यातही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे. या दौऱ्यामध्येही मुरली विजयनं चांगली कामगिरी केली तर तो भारतीय टीमची नवी भिंत म्हणून उदयास येईल.