जावेद मियांदादने काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं

जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए भारताने रद्द केलं.

Updated: Aug 26, 2019, 09:32 PM IST
जावेद मियांदादने काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं title=

कराची : जम्मू-काश्मीरला विशेष अधिकार देणारं अनुच्छेद ३७० आणि ३५ ए भारताने रद्द केलं. भारताच्या या भूमिकेनंतर पाकिस्तान चांगलाच खवळला आहे. भारताने हा निर्णय घेतल्यानंतर पाकिस्तानने सगळ्या देशांची मदत मागितली, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना अपयशच आलं. यानंतर आता पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियांदादने काश्मीर प्रश्नात नाक खुपसलं आहे.

जावेद मियांदाद पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन तिथल्या लोकांना भारताविरुद्ध भडकवणार आहे. 'काश्मिरी जनतेला पाठिंबा देण्यासाठी मी नियंत्रण रेषेवर (एलओसी) जाणार आहे. काश्मीरला कोणीही पाकिस्तानपासून वेगळं करू शकत नाही. काश्मिरी जनतेला त्यांचे अधिकार मिळाले पाहिजेत. भारताकडून काश्मिरींवर होत असलेल्या अत्याचाराविरुद्ध मी आंदोलन करणार आहे', असं वक्तव्य जावेद मियांदादने केलं आहे.

'काश्मीरच्या परिस्थितीकडे जगाचं लक्ष जाण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. जगातल्या इतर खेळाडूंनीही माझ्या आंदोलनात सामिल व्हावं. ज्यांना माझ्यासोबत यायचं आहे, त्यांनी यावं. काश्मिरींचा संघर्ष संपणार नाही. जगात नवीन देश बनत राहतील. जशाप्रकारे पाकिस्तान बनणं कोणीही रोखू शकलं नाही, तशाच प्रकारे आझाद काश्मीर बनणंही कोणी रोखू शकणार नाही,' असं मियांदाद म्हणाला.

याआधी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर, शाहिद आफ्रिदी आणि सध्याचा कर्णधार सरफराज अहमद यानेही प्रतिक्रिया दिल्या होत्या.

शोएब अख्तरने ट्विटसोबत डोळ्याला पांढरी पट्टी लावलेल्या एका लहान मुलाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवरही एक संदेश लिहिण्यात आला आहे. 'बलिदान म्हणजे काय हे तूला पाहून समजतं. तुमच्या स्वातंत्र्यासाठी प्रार्थना. जगण्यासाठीचा महान उद्देश #Kashmir 'असं कॅप्शन शोएबने फोटोला दिलं होतं.

सरफराज अहमदची प्रतिक्रिया

याआधी पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद आणि माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीही काश्मीरच्या मुद्द्यावर बरळले होते. 'संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या आमच्या बंधूंसोबत आहे. या कठीण काळात अल्लाहने काश्मिरींचा बचाव करावा, अशी प्रार्थना मी करतो,' असं सरफराज बकरी ईदच्या नमाजनंतर म्हणाला. काश्मिरी जनतेएवढचं दु:ख आणि यातना आम्हालाही झाल्या आहेत. संपूर्ण पाकिस्तान काश्मीरच्या जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया सरफराजने दिली.

काय म्हणाला आफ्रिदी?

'संयुक्त राष्ट्राच्या ठरावानुसार काश्मिरींना त्यांचे अधिकार दिले पाहिजेत. आपल्यासारखेच स्वातंत्र्याचे अधिकार त्यांना मिळाले पाहिजेत. संयुक्त राष्ट्राची निर्मिती का झाली आहे? ते झोपलेले का आहेत? काश्मीरमध्ये होत असलेलं आक्रमण आणि गुन्हे माणुसकीविरोधात आहेत, याची नोंद घेतली गेली पाहिजे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे,' असं ट्विट शाहिद आफ्रिदीने केलं. आफ्रिदीने त्याच्या ट्विटमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही टॅग केलं.