IPL: 'मूर्ख तू नाहीस, तर मी आहे,' ...अन् संतापलेल्या धोनीने घातल्या शिव्या, CSK च्या खेळाडूने केला खुलासा

चेन्नई सुपरकिंगजचा (CSK) माजी गोलंदाज मोहित शर्माने (Mohit Sharma) महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) जेव्हा संतापला होता अशा काही घटनांचा उल्लेख केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Sep 25, 2024, 06:18 PM IST
IPL: 'मूर्ख तू नाहीस, तर मी आहे,' ...अन् संतापलेल्या धोनीने घातल्या शिव्या, CSK च्या खेळाडूने केला खुलासा title=

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) जितका संयमी आणि शांत आहे तितकाच त्याच्यात रागही आहे. त्याच्यासह खेळलेले खेळाडू याची साक्षीदार आहे. फक्त नशीब म्हणून महेंद्रसिंग धोनी वर्ल्डकप (World Cup) आणि पाच वेळा आयपीएल (IPL) ट्रॉफी जिंकलेला नाही. क्रिकेटप्रती असलेलं त्याचं वेड आणि धोरणं यामुळेच त्याने हे यश मिळवलं आहे. हे यश मिळवताना नक्कीच असे काही क्षण आले असतील जेव्हा धोनीचा संयम सुटला असेल. 2009 मध्ये जेव्हा धोनीने मुस्तफिजूर रहमानला दिलेला धक्का आठवतो का? इतकंच कशाला जेव्हा मनिष पांडे नॉन स्ट्राइकर एंडला असताना त्याच्याकडे लक्ष देतन नव्हता त्याने हासडलेली शिवी कशी विसराल?

चेन्नईच्या अनेक खेळाडू जे धोनीची स्तुती करतात ते तुम्हाला धोनी संतापल्यावर काय होतं याबद्दलही सांगतील. नुकतंच मोहित शर्माने कशाप्रकारे त्याने आणि त्याच्या सहकारी गोलंदाजांनी धोनीचा राग झेलला आहे याबद्दल खुलासा केला. मोहितने धोनीबद्दल दोन वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी सांगितल्या आहेत. 2013, 2015,  2019 मध्ये मोहित शर्मा धोनीच्या नेतृत्वात खेळला आहे. मोहित 69 विकेट्ससह चेन्नईच्या सर्वाधिक विकेट घेणाऱ्यांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे. धोनीने आपल्याला दिलेल्या सल्ल्यांबद्दलही मोहित शर्माने सांगितलं.

"आम्हाला त्याच्याकडून फार शिव्या ऐकाव्या लागल्या आहेत. पण तो म्हणतो, जे मैदानावर घडतं, ते तिथेच सोडून द्यायचं. यानंतर तो तुम्हाला समजावून सांगतो. हे करताना तो अजिबात रागवत नाही. मी त्याच्याकडून फार काही ऐकलं आहे. एक जलदगती गोलंदाज म्हणून अनेकदा तुमचं लक्ष्य विचलित होण्याची शक्यता असते. तुमच्या पाठीमागे जे काही होतंय त्याकडे लक्ष द्या. जर त्याने तुम्हाला हात दाखवला आणि तुम्ही भलतीकडेच पाहत असाल. प्रेक्षकांमधील कोणी काही बोललं आणि तुम्ही त्यावर व्यक्त होता. असा काही गोष्टींमुळे धोनी अनेकदा माझ्यावर संतापला आहे," असं मोहित शर्माने '2 Sloggers' पॉडकास्टमध्ये सांगितलं. 

मोहित संघातून बाहेर पडल्यानंतर दीपक चहरच्या खांद्यावर जबाबदारी देण्यात आली होती. कॅमेऱ्यात अनेकदा धोनी खेळकरपणे चहरला मारताना किंवा काही अपशब्द बोलताना कैद झालं आहे. आयपीएल 2019 मध्ये चहरने 22 विकेट घेतल्या. याच सीझनमध्ये धोनीने चहरला त्याची चारही षटके सुरुवातीस एकाच वेळी टाकण्याची संधी दिली. मोठ्या भावाप्रमाणे धोनी चहरचा पाय खेचतो पण त्याचवेळी त्याच्याबद्दल आपुलकीही दाखवतो, असे मोहितने नमूद केलं.

"दीपक चहरलाही खूप शिव्या खाव्या लागल्या आहेत. त्याचीही एक गोष्ट आहे. 2019 मध्ये दीपक खेळत होता, आणि मी नव्हतो. तो सामना चेन्नईत होता, आणि प्रत्येकजण खूप थकला होता. त्याने एक नकल बॉल टाकला जो माझ्या मते फुल टॉस का काहीतरी होता. या चेंडूवर चौकार का षटकार लगावण्यात आला होता. यानंतर धोनीने त्याला पुन्हा गोलंदाजी करु नको सांगितलं. तो ओके माही भाई म्हणाला. 2-3 चेंडूनंतर त्याने पुन्हा एकदा नकल चेंडू टाकला जो फलंदाजाच्या डोक्यावरुन गेला," अशी आठवण मोहितने सांगितली.

पुढे तो म्हणाला की, "माही भाई त्याच्याकडे आला आणि आपले हात दीपकच्या खांद्यावर ठेवले. काहीतरी बोलून तो परत गेला. आम्हाला नक्कीच तो काय बोलला माहिती नव्हतं. सामना संपल्यानंतर आम्ही काय झालं? असं विचारलं. त्यावर त्याने सांगितलं, 'तुला माहितीये तो काय बोलला? त्याने काही सुंदर गोष्टी सांगितल्या (शिव्या). यानंतर तो म्हणाला मूर्ख तू नाहीस तर मी आहे. ही गोष्ट नेहमीच आमच्या लक्षात राहते".