बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानला (Saif Ali Khan) लिलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालक भजन सिंग राणाने (Bhajan Singh Rana) अभिनेत्याने आपल्याला किती पैसे दिले याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे. 21 जानेवारीला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सैफ अली खानने भजन सिंग राणाची भेट घेतली. यावेळी त्याने किती पैसे मिळाले हे उघड करण्यास नकार देत, हे फक्त आमच्या दोघांत असल्याचं म्हटलं. आपण त्याच्याकडे कोणतंही बक्षीस मागणार नाही, पण जर त्याने काही भेट दिली तर नकारही देणार नाही असं त्याने सांगितलं आहे.
जर सैफ अली खानने काही भेट दिली तर स्विकारणार का? असं विचारलं असता रिक्षाचालकाने म्हटलं आहे की, "मी मागत तर नाहीये, पण जर त्यांना काही द्यायचं असेल तर देऊ शकतात. मी कधीच म्हटलेलं नाही की, मी जे केलं आहे त्यासाठी मला काही मिळावं किंवा मला त्याची हौस वाटत आहे".
सैफ अली खानने रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर भजन सिंग राणाची भेट घेतल्यानंतर आभार मानत 50 हजार दिले असा दावा काही रिपोर्टमधून करण्यात आला आहे. पण राणाने किती पैसे मिळाले याचा खुलासा करण्यास नकार दिला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला की, "मी त्याला आश्वासन दिलं आहे आणि ते पाळणार. लोकांना काय ते अंदाज लावू दे. लोकांना त्याने मला 50 हजार किंवा 1 लाख दिले असं म्हणू देत. पण मी किती पैसे दिले हे उघड करणार नाही. त्याने मला ही माहिती जाहीर न करण्याची विनंती केली आहे आणि मी ते आश्वासन पाळणार. जे काही आहे ते आमच्या दोघांमध्ये आहे".
लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळण्याच्या पाच मिनिटं आधी सैफ अली खानने रिक्षाचालकाची भेट घेतली. यावेळी सैफने त्याला मिठी मारुन आभार मानले. यावेळी सैफने आपली आई शर्मिला टागोर यांचीही ओळख करुन दिली. यावेळी राणा त्यांच्या पाया पडला.
16 जानेवारीला वांद्रे येथील त्याच्या घरी चोरीच्या प्रयत्नात एका घुसखोराने सैफ अली खानवर सहा वेळा चाकूने वार केले. हल्ल्यानंतर त्याला तातडीने लिलावती रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मुंबई पोलिसांनी रविवारी ठाणे येथून हल्लेखोर, 30 वर्षीय बांगलादेशी रहिवासी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला अटक केली. त्याच दिवशी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.