'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडला

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाच्या यशात स्वप्निल सिंगने (Swapnil Singh) महत्त्वाची भूमिका निभावली आहे. मात्र चाहत्यांकडून होणाऱ्या चर्चेत त्याच्या नावाचा फारसा उल्लेख होताना दिसत नाही.   

शिवराज यादव | Updated: May 20, 2024, 02:54 PM IST
'मला फक्त एक संधी द्या,' RCB च्या स्टार खेळाडूला अश्रू अनावर; प्रवास उलगडताना ढसाढसा रडला title=

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bengaluru) आयपीएल स्पर्धा मध्यात आल्यानंतर दमदार पुनरागमन करत थेट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. बंगळुरु संघाच्या यशाची चर्चा करताना विराट कोहली, ग्लेन मॅक्सवेल, विल जॅक्स, कॅमेरुन ग्रीन, रजत पाटीदार या फलंदाजांची चर्चा होते. दरम्यान जेव्हा गोलंदाजांचा उल्लेख होतो तेव्हा मोहम्मद सिराज, यश दयाल यांचं नाव घेतलं जात आहे. पण या सर्वांमध्ये एका खेळाडूला मात्र दुर्लक्षित केलं जात आहे. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून या खेळाडूने बंगळुरु संघाच्या यशात मोलाची भूमिका निभावली आहे.

2008 मधील आयपीएलच्या लिलावात स्वप्निल सिंगला मुंबई इंडियन्सने घेतलं होतं. पण त्याला पदार्पणासाठी तब्बल 16 वर्षं वाट पाहावी लागली. अखेर लखनऊ सुपर जायंट्समध्ये मुख्य प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी त्याला खेळण्याची संधी दिली. अँडी फ्लॉवर जेव्हा बंगळुरु संघाकडे जात होते तेव्हा स्वप्निलने त्यांना आपल्याला शेवटची संधी द्या असं सांगितलं. बंगळुरुच्या प्री-सीजन ट्रायल कॅम्पमध्ये स्वप्निलने त्यांना हे कदाचित आपलं शेवटचं वर्षं असेल असं सांगितलं होतं. 

बंगळुरुने एक्सवर स्वप्निलचा व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्याने आपला प्रवास उलगडला असून त्यात भावनिक झालेला दिसत आहे. वयाच्या 14 व्या वर्षी त्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. करिअरच्या सुरुवातील काही दौऱ्यात तो विराट कोहलीचा रुममेटही होता. यानंतर 2008 च्या आयपीएल लिलावात त्याला मुंबईने घेतलं. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. आठ वर्षांनी पंजाबने त्याला विकत घेतलं. पण तिथेही त्याला संधी मिळाली नाही. यानंतर लखनऊचा नेट बॉलर म्हणून तो परतला. अखेर तिथे त्याला प्लेईंग 11 मध्ये संधी मिळाली. तो 2 सामन्यात खेळला. पुढील वर्षी आपल्याला पुन्हा संघात घेतलं जाईल असी त्याला आशा होती. पण त्याच्या आशा फोल ठरल्या. यानंतर त्याची बेस प्राईस 20 लाख करण्यात आली. 

“लिलावाच्या दिवशी, मी रणजीसाठी देहरादूनला जात होतो आणि आम्ही संध्याकाळी 7-8 च्या सुमारास कुठेतरी उतरलो. आयपीएल लिलावाची शेवटची फेरी सुरू होती, तोपर्यंत काहीही झालेलं नव्हतं. मी आता सगळं संपलं आहे असं स्वत:ला सांगितंलं. मी चालू सीझन (रणजी) खेळेन, आणि गरज पडली तर सोडून द्या म्हणेन कारण मला आयुष्यभर खेळायचं नाही. तुम्हाला जग जिंकण्यासाठी इतर गोष्टीही असतात. मी खूप निराश झालो होते. पण जेव्हा माझ्या कुटुंबाने फोन केला तेव्हा मात्र आम्ही रडू लागलो. हा किती भावनिक प्रवास होता हे अनेकांना माहिती नाही,” असं स्वप्नील म्हणाला.

बंगळुरु सुरुवातीला फिरकी गोलंदाज कॉम्बिनेशनसाठी झगडत होतं, पण स्वप्निलला संधी मिळाली आणि त्याने विश्वास सार्थ ठरवला. बंगळुरुने थेट नवव्या सामन्यात स्वप्निलला संधी दिली. हैदरबादविरोधातील या सामन्यात त्याने महत्वाचे विकेट काढले.