IPL 2024: भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर इरफान पठाणने (Irfan Pathan) चेन्नई सुपरकिंग्जचा (Chennai Super Kings) स्टार खेळाडू महेंद्रसिंग धोनीवर (Mahendra Singh Dhoni) जोरदार टीका केली आहे. रविवारी पंजाब किंग्सविरोधातील (Punjab Kings) सामन्यात महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला होता. यावरुन इरफान पठाणने नाराजी जाहीर केली आहे. धरमशाला येथील सामन्यात धोनी त्याच्या टी-20 करिअरमध्ये पहिल्यांदाच नवव्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला आणि शून्यावर बाद झाला. पंजाबच्या हर्षल पटेलने त्याला बाद केला. महेंद्रसिंग धोनीने आता आपल्या खांद्यावर जबाबदारी घेत, वरच्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलं पाहिजे असं इरफान म्हणाला आहे.
"महेंद्रसिंग धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने चेन्नई संघाला काही फायदा होणार नाही. संघाला यामुळे कोणतीही मदत होत नाही आहे. तो 42 वर्षांचा आहे याची मला कल्पनाआहे. पण तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने आता फलंदाजीला वरच्या क्रमांकावर येण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. त्याने किमान 4 ते 5 ओव्हर्स फलंदाजी करायला हवी. तो अखेरच्या ओव्हर्समध्ये खेळत आहे. त्याने शेवटच्या 2 ओव्हर्स खेळल्याने चेन्नई संघाला दीर्घकाळात कोणतीही मदत होणार नाही," असं इरफान पठाण म्हणाला आहे.
महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने आपल्या 7 डावांमधअये 55 ची सरासरी आणि 224.49 च्या स्ट्राइक रेटने 110 धावा केल्या आहेत. "येथून कदाचित चेन्नई संघ प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची शक्यता आहे. त्यांना 90 टक्के सामना जिंकायचा आहे. पण एक वरिष्ठ खेळाडू म्हणून त्याने वरच्या क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे. काही मोजक्या क्षणी केलेल्या गोष्टी आता नियमितपणे करण्याची गरज नाही," असं इरफान म्हणाला.
"त्याने मुंबईविरोधात नक्कीच आपल्या खेळीने फरक पाडला होता. पण येथे जेव्हा जेव्हा संघाला गरज होती, तेव्हा शार्दूल ठाकूरला आपल्या आधी पाठवू शकत नाही. तुम्ही धोनीला नवव्या क्रमांकावर फलंदाजी करताना पाहू शकत नाही. 15 व्या ओव्हरला समीर रिझवीदेखील फलंदाजीसाठी तयार होता. कम ऑन यार, किमान 4 ओव्हर तरी खेळ," असं इरफानने सांगितलं आहे.