IPL 2020 : पहिल्या मॅचमध्ये काय असणार मुंबई-चेन्नईची रणनिती?

आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Sep 18, 2020, 11:04 PM IST
IPL 2020 : पहिल्या मॅचमध्ये काय असणार मुंबई-चेन्नईची रणनिती? title=

दुबई : आयपीएलच्या १३व्या मोसमाला शनिवारपासून सुरुवात होणार आहे. गतविजेती मुंबई आणि चेन्नईच्या टीममध्ये पहिला सामना रंगणार आहे. कोरोना व्हायरसच्या संक्रमणामुळे यंदा प्रेक्षकांशिवायच सामने होणार आहेत. तसंच युएईमधल्या संथ खेळपट्ट्यांमुळे सगळ्याच टीमना वेगळी रणनिती अवलंबवावी लागणार आहे. 

चेन्नईला सुरुवातीलाच धक्के

चेन्नईच्या टीमला आयपीएल सुरु व्हायच्या आधीच दोन धक्के बसले आहेत. सुरेश रैना आणि हरभजन सिंग यांनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्यामुळे धोनीला या दोन तगड्या खेळाडूंचे बदली खेळाडू शोधावे लागणार आहेत. तर रैनाचा बदली खेळाडू म्हणून मानला जाणारा ऋतुराज गायकवाड अजूनही पूर्णपणे फिट नाही, त्यामुळे तो पहिली मॅच खेळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये केदार जाधव आणि रवींद्र जडेजावर मोठी जबाबदारी येऊ शकते. 

चेन्नईकडून शेन वॉटसन, अंबाती रायुडू ओपनिंगला खेळण्याची शक्यता आहे. धोनीकडे फाफ डुप्लेसिसलाही खेळवण्याचा पर्याय आहे. पण टीम संयोजनावर या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. नियमानुसार टीममध्ये ४ परदेशी खेळाडू असू शकतात, त्यामुळे वॉटसन आणि ब्राव्होचं खेळणं निश्चित आहे. तर बॉलिंगमध्ये लुंगी एनगिडी, इमरान ताहीर आणि मिचेल सॅन्टनर हे तीन पर्याय आहेत. 

मुंबईची रणनिती काय?

दुसरीकडे मुंबईने क्रिस लीनला टीममध्ये घेतलं आहे, पण सुरुवातीच्या मॅचमध्ये त्याची खेळण्याची शक्यता कमी आहे. रोहित शर्मा आणि क्विंटन डिकॉक ओपनिंगला खेळणार आहेत, हे कर्णधार रोहित शर्माने स्पष्ट केलं आहे. मागच्या वर्षी या दोघांनी चांगली कामगिरी केली होती. या जोडीने २०१९ मध्ये १५ मॅचमध्ये ५६५ रन केले होते. 

मागच्या मोसमात रोहितने ४०५ रन केले होते, तर डिकॉकने ३५.२६ च्या सरासरीने ५२९ रन केले होते. मधल्या फळीत मुंबईकडे सूर्यकुमार यादव, कायरन पोलार्ड, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांचासारखे तगडे खेळाडू आहेत. तसंच गरज पडली तर इशान किशन. शेरफन रदरफोर्ड, सौरभ तिवारी यांचा पर्यायही रोहितपुढे खुला आहे. 

मुंबईच्या टीमकडे बघितलं तर स्पिन बॉलिंग त्यांच्यासाठी कमकुवत ठरू शकते, कारण राहुल चहर आणि जयंत यादव हे पर्याय मुंबईकडे आहेत. मुंबईला राहुल चहरकडून मागच्या वर्षीसारख्या कामगिरीची अपेक्षा असेल. मुंबईचा हुकमी एक्का असलेला लसिथ मलिंगा यंदाच्या मोसमात खेळणार नाही. त्याच्याऐवजी बुमराहवर जास्त जबाबदारी असणार आहे. बुमराहबरोबर ट्रेन्ट बोल्ट, नॅथन कुल्टर नाईल, जेम्स पॅटिनसन, धवल कुलकर्णी हे फास्ट बॉलिंगसाठीचे पर्याय आहेत.