वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी; सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड शरण आलाय. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्यानं शरणागती पत्करलीये. संतोष देशमुखांच्या हत्येत सहभाग नसल्याचा दावा वाल्मिकनं केलाय. वाल्मिकचा हा दावा इतरांना मात्र मान्य नाही.

वनिता कांबळे | Updated: Jan 1, 2025, 12:12 AM IST
वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी;  सीआयडीसमोर शरणागती पत्करल्यानंतर मोठ्या घडामोडी title=

Walmik Karad Surrender : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर फरार झालेला वाल्मिक कराड अखेर पुण्यात सीआयडीला शरण गेलाय. त्याची पुणे सीआयडी कार्यालयात चौकशी केल्यानंतर सीआयडीचे अधिकारी वाल्मिकला घेऊन केजकडे रवाना झालेत. रात्री उशीरा वाल्मिकला केज कोर्टात हजर करण्यात आले. वाल्मिक कराडला 14 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

गेल्या दोन दिवसांपासून वाल्मीक कराड हा पुण्यात शरण येणार असल्याची माहिती होती. पण सोमवारी वाल्मिक कराडनं सीआयडीसमोर शरणागती पत्करली नव्हती. तोपर्यंत सीआयडीनं त्याच्या निकटवर्तीय महिलांची चौकशी केली. शिवाय 25 जणांचीही झाडाझडती घेतली. अनेक जणांची बँक खाती गोठवल्यानंतर वाल्मिक कराडभोवतीचा फास आवळला गेला. वाल्मिक कराडनं शरण जाण्यापूर्वी एक व्हिडिओ पोस्ट केला.

वाल्मिक कराडचा निर्दोष असल्याचा दावा संदीप क्षीरसागरांनी फेटाळून लावलाय. तुम्ही निर्दोष आहात मग फरार का झाला असा सवाल संदीप क्षीरसागरांनी उपस्थित केलाय. वाल्मिक कराडच्या शोधासाठी सीआयडीनं वेगवेगळ्या पद्धती वापरल्या. त्यामुळंच वाल्मिक कराड शरण आल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय.

वाल्मिक कराड आणखी काही दिवस फरार राहिला असता तर त्यांची संपत्ती जप्त झाली असती त्यामुळंच नाईलाजानं वाल्मिक शरण गेल्याचं सुरेश धस यांनी सांगितलं. वाल्मिक कराडला फक्त खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक नको तर त्याला मोक्का लावण्याची मागणी संभाजीराजे छत्रपतींनी केलीये.वाल्मिक कराडवर पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे. सीआयडी आता वाल्मिकला संतोष देशमुख प्रकरणात सहआरोपी करणार का याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलंय.