माऊंट मांगनुई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली तिसरी आणि शेवटची वनडे मॅच मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. न्यूझीलंडने पहिल्या दोन्ही मॅच जिंकून सीरिज आधीच खिशात टाकली आहे, त्यामुळे भारताला व्हाईट वॉश टाळण्याचं आव्हान असेल. भारताने आधी टी-२० सीरिजमध्ये न्यूझीलंडचा ५-०ने पराभव केला होता. आता न्यूझीलंड वनडे सीरिजमध्ये टी-२० पराभवाचा बदला घ्यायचा प्रयत्न करेल.
भारताने पहिली वनडे ४ विकेटने तर दुसरी वनडे २२ रनने हारली होती. आता तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय टीममध्ये बदल होण्याची शक्यता आहे. ऋषभ पंतला या मॅचमध्ये संधी दिली जाऊ शकते. न्यूझीलंड दौऱ्यामध्ये ऋषभ पंतला खेळण्याची एकही संधी मिळालेली नाही. ऋषभ पंतशिवाय मनिष पांडेला खेळवण्याचा विचारही विराट करु शकतो. मनिष पांडेने टी-२० सीरिजमध्ये शानदार कामगिरी केली होती, पण तरीही त्याला पहिल्या २ वनडेसाठी टीममध्ये स्थान देण्यात आलं नाही.
दुसरीकडे न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचंही टीममध्ये पुनरागमन झालं आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे विलियमसन टी-२० सीरिजच्या शेवटच्या २ मॅच आणि पहिल्या २ वनडे खेळू शकला नाही. टी-२० सीरिजच्या पहिल्या मॅचमध्ये विलियमसनने अर्धशतक केलं, तर तिसऱ्या मॅचमध्ये ९५ रनची शानदार खेळी केली.
केन विलियमसनच्या अनुपस्थितीमध्ये टीम साऊदीने टी-२० सीरिजमध्ये आणि टॉम लेथमने वनडे सीरिजमध्ये न्यूझीलंडचं नेतृत्व केलं. केन विलियमसनसोबतच ईश सोदी आणि ब्लेयर टीकनरही परतले आहेत.
ईश सोदी आणि ब्लेयर टीकनरला न्यूझीलंड ए आणि भारत ए या मॅचसाठी सोडून देण्यात आलं होतं. न्यूझीलंडच्या टीममध्ये असलेले टीम साऊदी, स्कॉट कुगलाईन आणि मिचेल सॅन्टनर आजारी पडले. ताप असतानाही टीम साऊदी दुसरी वनडे खेळला. हे तिन्ही खेळाडू आजारी असल्यामुळे न्यूझीलंडने ईश सोदी आणि ब्लेयर टीकनरला टीममध्ये परत बोलावलं.
भारतीय टीम
विराट कोहली (कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, केएल राहुल, मनिष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, शार्दुल ठाकूर, केदार जाधव, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव
न्यूझीलंडची टीम
केन विलियमसन (कर्णधार), टॉम लेथम, मार्टीन गप्टील, हेन्री निकोल्स, रॉस टेलर, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, कॉलिन डि ग्रॅण्डहोम, मिचेल सॅन्टनर, टीम साऊदी, हॅमिश बेनेट, ईश सोदी, टॉम ब्लेंडल, काईल जेमीसन, स्कॉट कुगलाईन