ऑकलंड : न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय टीमची वनडे सीरिज संपल्यानंतर टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. दोन्ही टीममध्ये २ टेस्ट मॅचची सीरिज खेळवण्यात येणार आहे. या सीरिजआधी अजिंक्य रहाणे फॉर्ममध्ये आला आहे. रहाणेने भारत-ए कडून खेळताना न्यूझीलंड-ए विरुद्ध नाबाद शतकी खेळी केली आहे.
अजिंक्य रहाणेसोबतच शुभमन गिलनेही शतक केलं आहे. तर हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा आणि विजय शंकरने अर्धशतकं केली. भारत-एच्या सुरुवातीच्या पाचही बॅट्समननी ५०पेक्षा जास्त रन केले. शुभमन गिलने सर्वाधिक १३६ रन आणि अजिंक्य रहाणेने नाबाद १०१ रनची खेळी केली. कर्णधार हनुमा विहारीने ५९ रन, चेतेश्वर पुजाराने ५३ रन आणि विजय शंकरने ६६ रन केले. विकेट कीपर श्रीकर भारत २२ रनवर आऊट झाला आणि आर अश्विन १ रनवर नाबाद राहिला.
भारतीय बॅट्समनच्या दमदार कामगिरीमुळे चार दिवसांची ही मॅच ड्रॉ झाली. न्यूझीलंड-एने या मॅचमध्ये टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. ३८६/९ या स्कोअरवर डाव घोषित करुन न्यूझीलंड-एने भारत-एला बॅटिंगला बोलावलं. भारत-ए कडून मोहम्मद सीराज, संदीप वॉरियर, आर अश्विन, आवेश खान यांना प्रत्येकी २-२ विकेट मिळाल्या. तर शाहबाज नदीमला १ विकेट घेता आली.
न्यूझीलंड-ए कडून डॅरेल मिचलने नाबाद १०३ रन केले, तर ग्लेन फिलिप्सने ६५ रन आणि डेन क्लिव्हरने ५३ रनची खेळी केली. वनडे सीरिज संपल्यानंतर न्यूझीलंड-११ आणि भारतीय टीममध्ये ३ दिवसांचा एक सराव सामना होणार आहे. १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारीदरम्यान ही मॅच होईल. या मॅचनंतर २१ फेब्रुवारीपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होईल. २९ फेब्रुवारीपासून दुसरी आणि शेवटची टेस्ट मॅच खेळवली जाईल.
टेस्ट सीरिजसाठी भारतीय टीम
विराट कोहली(कर्णधार), मयंक अग्रवाल, पृथ्वी शॉ, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, ऋद्धीमान सहा, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, ईशांत शर्मा