Team India : आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. येत्या गुरुवारी म्हणजे 15 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (India vs New Zealand) सेमीफायनल खेळवली जाणार आहे. यादरम्यान एका मुंबईकर क्रिकेटपटूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा क्रिकेटपटू ज्या वेगाने टीम इंडियात आला त्याच वेगाने तो बाहेर फेकला गेला. अभिनय, व्यसन, प्रेमप्रकरण आणि अपयशामुळे तो खचला, शेवटी त्याला पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं. 1990 च्या दशकात भारतीय क्रिकेट गाजवणाऱ्या या खेळाडूचं नाव आहे सलिल अंकोला.
ज्या काळात सलिल अंकोलाने (Salil Ankola) टीम इंडियात पदार्पण केलं. साधारण त्याच काळात अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ आणि सचिन तेंडुलकरसारख्या दिग्गज खेळाडूंनी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. या खेळाडूंच्या कामगिरीसमोर सलिल अंकोला मागे पडला. सलिल अंकोल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरबरोबरही खेळला आहे. इतकंच नाही तर 1996 विश्वचषकातही त्याने टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. 1993 हिरो चषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात सलिलने 33 धावांत 3 विकेट घेतल्या, त्याच्या एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी होती.
सचिनबरोबर सुरुवात
सचिन तेंडुलकरच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात धमाकेदार झाली. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आणि सलिल अंकोलाने एकाचवेळी मैदानावर पाय ठेवला. पण सचिन तेंडुलकर आपल्या कामगिरीच्या जोरावर खूप पुढे गेला. तर सलिल अंकोल भारतासाठी केवळ एक कसोटी आणि वीस एकदिवसीय सामने खेळला. त्यानंतर त्याला संघाबाहेर बसावं लागलं. काही काळा अज्ञातवासात राहिल्यानंतर सलिल अंकोलाने टीव्ही मालिका आणि चित्रपटात आपलं नशीब अजमावलं. तब्बल 25 टीव्ही मालिकांमध्ये सलिल अंकोलाने काम केलंय. शिवाय संजय दत्त सारख्या अभिनेत्यांबरोबरही त्याने स्क्रिन शेअर केली.
व्यसनाच्या आहारी
टीव्ही मालिका आणि चित्रपटात सलिल अंकोलाची कारकिर्द घडत असतानाच त्याला दारूचं व्यसन जडलं. यातून बाहेर पडण्यासाठी त्याला पुनर्वसन केंद्राचा आधारा घ्यावा लागला. 2020 मध्ये सलिल अंकोला पुन्हा क्रिकेटशी जोडला गेला. मुंबई क्रिकेट संघाच्या सिलेक्टरपदी त्याची नेमणूक करण्यात आली. सलिल अंकोला सध्या भारतीय सीनिअर क्रिकेट संघाच्या निवड समितीचा सदस्य आहे.