एकदिवसीय वर्ल्डकपचे ग्रुप स्टेजमधील सामने संपले आहेत. आता सेमी-फायनल राऊंड सुरु होणार आहे. दरम्यान वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघाची स्थिती फारच वाईट झाली. बाबर आझमच्या नेतृत्वातील संघाने 9 पैकी फक्त 4 सामने जिंकले आणि स्पर्धेतून बाहेर पडले. पाकिस्तान संघ आपला शेवटचा सामना खेळून मायदेशी पोहोचलीदेखील आहे. पण याचवेळी एक मोठा भूकंप आला आहे. पाकिस्तान संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्कल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
दक्षिण आफ्रिकेचे माजी जलदगती गोलंदाज मोर्केल यांचा पाकिस्तान संघाशी 6 महिन्यांचा करार होता. जून महिन्यात त्यांनी पदभार स्विकारला होता. त्यांच्या प्रशिक्षकपदात पाकिस्तान संघाने श्रीलंका दौऱ्यात आपली पहिली कसोटी मालिका जिंकली होती.
Morne Morkel resigns as Pakistan bowling coach
Details here https://t.co/El3BgWVbjh
— PCB Media (@TheRealPCBMedia) November 13, 2023
आता पाकिस्तान क्रिकेट संघ आपली आगामी मालिका ऑस्ट्रेलियात खेळणार आहे. हा दौरा 14 डिसेंबरला होणार आहे. यादरम्यान पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. आम्ही लवकरच नव्या गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा करणार असल्याचं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केलं आहे.
पाकिस्तान संघ आपल्या मायदेशी दाखल झाला आहे. पण सर्व खेळाडू एकाच वेळी गेलेले नाहीत. पहिल्या बॅचमध्ये 11 खेळाडू 12 नोव्हेंबरला सकाळी 8.55 ला रवाना झाले. इतक खेळाडू त्याच दिवशी रात्री 8.20 ला रवाना झाले. सर्व खेळाडूंनी कोलकातामधून विमानाने उड्डाण केलं. युएई मार्गे ते पाकिस्तानात दाखल झाले.
जलदगती गोलंदाज हसन अली सध्या भारतातच थांबला आहे. येथे त्याचं सासर आहे. तो 22 नोव्हेंबरला रवाना होणार आहे. पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक मिकी आर्थर 13 ते 16 नोव्हेंबरपर्यंत युएईमध्येच थांबणार आहे. यानंतर 16 नोव्हेंबरला ते लाहोरसाठी रवाना होणार आहेत.
नुकतंच पाकिस्तान क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता इंजमाम उल हकनेही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याने आपला राजीनामा पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे प्रमुख जका अशरफ यांना पाठवला आहे. हा राजीनामा मंजूर करण्याता आला.
53 वर्षीय इंजमामची हारुन रशीदने पद सोडल्यानंतर याचवर्षी ऑगस्ट महिन्यात पीसीबीचा प्रमुख निवडकर्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. इंजमाम तीन महिन्यापेक्षाही कमी काळ पदावर राहिले. रिपोर्टनुसार, यानंतर आता बाबर आझमही राजीनामा देण्याची शक्यता आहे. बाबरही बोर्डाच्या कामगिरीवर नाराज असल्याची चर्चा आहे.