भुजबळांना 'शाही' मानपान! अमित शाहांच्या सभेतील 'त्या' कृतीची चर्चा, भुजबळांना जवळ बोलावलं अन्...

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना केंद्र गृहमंत्री अमित शाहांनी बोलवून घेत स्वत:च्या शेजारी बसायला खुर्ची दिली

शिवराज यादव | Updated: Jan 24, 2025, 08:36 PM IST
भुजबळांना 'शाही' मानपान! अमित शाहांच्या सभेतील 'त्या' कृतीची चर्चा, भुजबळांना जवळ बोलावलं अन्... title=

राजकारणात जेवणाचं ताट द्यावं पण पाट देऊ नये असं म्हटलं जातं. मात्र मालेगावात आज एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना केंद्र गृहमंत्री अमित शाहांनी बोलवून घेत स्वत:च्या शेजारी बसायला खुर्ची दिली. मालेगावमध्ये सुरू असलेल्या सहकार परिषदेत हा प्रसंग पाहायला मिळाला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली आहे.

सहकार परिषदेत भुजबळांना 'शाही' मानपान

शाहांकडून भुजबळांना स्वतःच्या बाजूची खूर्ची

शाहा-भुजबळांच्या जवळीकीची जोरदार चर्चा

मालेगावच्या सहकार परिषदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी छगन भुजबळांना बोलवून घेत आपल्या बाजुच्या खुर्चीवर बसवून घेतलं. यावेळी अणित शाहांच्या उजव्या बाजुला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर डाव्या बाजुला छगन भुजबळ असं चित्र संपूर्ण कार्यक्रमात पाहायला मिळालं.. या कार्यक्रमा दरम्यान अमित शाहा आणि छगन भुजबळ यांच्या मस्त गप्पा रंगल्याचंही पाहायला मिळालं.. 

अमित शाहा एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी आपल्या भाषणात छगन भुजबळ यांचा उल्लेख  राष्ट्रवादीचे नेते असा न करता एनडीएचे महत्वाचे नेते असा उल्लेख केलाय. 

छगन भुजबळ भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून जोर धरताना पाहायला मिळत आहेत. आजच्या मालेगावातील भाषणातही भुजबळांनी हे संकेत दिले आहेत. दिल्ली राजधानी आहे तिथे कुणीही जाऊ शकतो असं सांगत भुजबळांनी अप्रत्यक्षपणे आपली पुढील वाटचाल स्पष्ट केली आहे. 

आजच्या कार्यक्रमात अमित शाह यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातल्या नेत्यांना छगन भुजबळ यांच्या पाठीशी असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे छगन भुजबळ लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार या चर्चांना बळ मिळत आहे.