ICC One Day International Rankings: एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची आयसीसी क्रमवारीत लॉटरी लागली आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने (Shaheen Shah Afridi) मोठी झेप घेतली आहे. शाहिन शाह आफ्रिदी नंबर वन गोलंदाज बनला आहे. तर फलंदाजीत बाबर आझमची (Babar Azam) बादशाहात संपवण्यापासून भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल (Shubman Gill) आता फक्त दोन पावलं दूर आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि स्टार फलंदाज विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) टॉप टेनमध्ये आहेत.
गोलंदाजीत शाहिन आफ्रिदीचा जलवा
गोलंदाजीत शाहीन शाह आफ्रिदीचा जलवा पाहिला मिळतोय. शाहीन आफ्रिदीच्या खात्यात 673 पॉईंट जमा झाले असून त्याने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवुडला मागे टाकलं आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचं एक स्थान घसरलं असून तो तिसऱ्या स्थानावर आलं आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. गोलंदाजांच्या यादीत न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पाचव्या क्रमांकावर आहे.
फलंदाजीत मोठे बदल
भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल फलंदाजी क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तर पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम पहिल्या स्थानावर कायम आहे. पण लवकरच बाबर आझमची पहिल्या स्थानावरची बादहाशत संपण्याची चिन्ह आहेत. शुभमन गिल बाबरपासून केवळ दोन पावलं दूर आहे. बाबर आझमच्या खात्यात 818 पॉईंट आहे. तर शुभमन गिलच्या खात्यात 816 पॉईंट आहेत. दोघांमध्ये केवळ 2 पॉईंटचं अंतर आहे. विश्वचषकात बाबर आणि शुभमनची कामगिरी पाहाता शुभमनसाठी हे आव्हान फारसं कठिण नाही.
रोहित, विराट टॉप टेनमध्ये
यंदाच्या विश्वचषकात जबरदस्त फॉर्मात असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहलीसुद्धा फलंदाजी क्रमवारीत टॉप टेनमध्ये आहे. रोहित शर्मा 743 पॉईंटसह पाचव्या तर विराट कोहली 735 पॉईंटसह सातव्या क्रमांकावर आहेत. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज हेनरिक क्लासेन सहाव्या स्थानावर आहे. टॉप 5 मध्ये बाबर आणि शुभमननंतर तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डि कॉक आहे. तर चौथ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा डावखुरा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर आहे.
विश्वचषकात कोणाचं पारडं जड
विश्वचषकात सर्वाधिक धावांच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डि कॉक 413 धावांसह पहिल्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नरच्या नावावर 413 धावा जमा असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर न्यूझीलंडचा रचिन रविंद्र 406 धावांसह तिसऱ्या आणि टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा 398 धावांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
विश्वचषकात पाकिस्तानची कामगिरी समाधानकारक झालेली नसली तरी पाकिस्तानाच प्रमुक वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीच्या नावावर विश्वचषकात आतापर्यंत सर्वाधिक विकेट जमा आहेत. शाहिन आफ्रिदिने सात सामन्यात 16 विकेट घेतल्या आहेत. तर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज अॅडम झम्पाच्या खात्यातही 16 विकेट असून तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर 14 विकेट असून तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.