सचिन, सचिन.. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पुन्हा घुमला आवाज, मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचं अनावरण

Sachin Tendulkar's Statue Unveiled : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला भारत आणि श्रीलंकादरम्यान सामना खेळवला जाणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर हा सामना खेळवला जाणार आहे. त्याआधी वानखेडे मैदानावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. 

राजीव कासले | Updated: Nov 1, 2023, 07:11 PM IST
सचिन, सचिन.. मुंबईच्या वानखेडे मैदानावर पुन्हा घुमला आवाज, मास्टर ब्लास्टरच्या पुतळ्याचं अनावरण title=

Sachin Tendulkar's Statue Unveiled : आयसीसी विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया (Team India) सातवा सामना खेळणार आहे. भारताचा श्रीलंकेशी (India Vs Sri Lanka) सामना होणार आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 2 नोव्हेंबरला मुंबईच्या वानखेडे मैदानावर (Wankhede Stadium, Mumbai) हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्याआधी वानखेडे मैदानावर पुन्हा एकदा सचिन सचिनचा नारा घुमला. निमित्त होतं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) पुतळयाचं अनावरण. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्यावतीने वानखेडे स्टेडिअमवर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात आला असून या पुतळ्याचं आज अनावरण करण्यात आलं. 

या कार्यक्रमाला स्वत: सचिन तेंडुलकरसह त्याची पत्नी अंजली तेंडुलकर, मुलगी सारा तेंडुलकर उपस्थित होते. याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), बीसीसीआयचे खजिनदार आशीष शेलार उपस्तिथ होते. सचिनचा फेव्हरेट शॉट खेळतानाचा हा पूर्णाकृती पुतळा असून वानखेडे स्टेडिअममधील सचिन तेंडुलकरच्या स्टँडजवळच हा पुतळा उभारण्यात आला आहे. प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी तयार केला आहे. सचिन तेंडुलकरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत कसोटीत 15,921 तर वनडेमध्ये 18,426 धावा केल्या आहेत.

सचिन तेंडुलकरच्या क्रिकेटमधल्या अमुल्य योगदानासाठी हा पुतळा उभारण्यात आला आहे. सचिन तेंडुलकर आपल्या 24 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीतील शेवटचा सामना मुंबईच्या याच वानखेडे मैदानावर खेळला होता. वेस्टइंडिजविरुद्ध हा त्याचा दोनशेवा कसोटी सामना होता. भारताने हा कसोटी सामना एक इनिंग आणि 126 धावांनी जिंकला आणि सचिन तेंडुलकरला विजयी गिफ्ट दिलं. वानखेडे स्टेडिअम सचिनसाठी आणखी एका कारणाने खास आहे, ते म्हणजे याच मैदानावर भारताने 2011 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. 

2011 एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर खेळवण्यात आला होता. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम सामन्यात श्रीलंकेवर मात करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर नाव कोरलं. या विजयाबरोबरच सचिन तेंडुलकरचं विश्वचषक जिंकण्याचं स्वप्नही पूर्ण झालं. 

देशात  क्रिकेट स्टेडिअमवर एखाद्या क्रिकेटरचा पुतळा उभारला जाणारा सचिन तेंडुलकर हा दुसरा खेळाडू आहे. याआधी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू कर्नल सीके नायडू तीन स्टेडिअमवर पुतळा उभारण्यात आला आहे. इंदौरचं होळकर स्टेडिअम, नागपूरचं विदर्भ क्रिकेट असोसिएशन आणि आंध्र प्रदेशच्या व्हायसीआर स्टेडिअमवर  सीके नायडू यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.