Haryana Steelers vs Bengaluru Bulls PKL 11: श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत हरियाणा स्टीलर्स संघाने आतापर्यंत १८ सामन्यांपैकी १४ सामने जिंकून साखळी गटात आघाडी स्थानी कायम आहे याउलट बंगळुरू बुल्स संघ तळाच्या स्थानी १२ व्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत झालेल्या १७ सामन्यांपैकी फक्त दोनच सामन्यांमध्ये विजय मिळविला आहे. त्यामुळे ११ डिसेंबर रोजी झालेल्या सामन्यात हरियाणा संघाचीच बाजूवर चढ राहिल अशी अपेक्षा होती. मात्र सुरुवातीला बंगळूरु संघाच्या खेळाडूंनी त्यांना चांगली लढत दिली. त्यामुळेच पहिले दहा मिनिटे गुणफलकावर एकही गुण नोंदविला गेला नव्हता.
दहाव्या मिनिटाला हरियाणा संघाकडे ७-६ अशी केवळ एक गुणाची आघाडी होती. मध्यंतराला त्यांनी १५-११ अशी आघाडी मिळविली होती. मध्यंतरापर्यंतच्या खेळामध्ये हरियाणा संघाच्या विनय, शिवम तरटे, विशाल ताटे या भरवशाच्या खेळाडूंना अपेक्षेइतके यश मिळाले नव्हते. बंगळुरू संघातील खेळाडू केव्हा सामना फिरवण्याबाबत ख्यातनाम असल्यामुळेच हरियाणा संघाच्या खेळाडू सावध पवित्र घेतला होता.
उत्तरार्धातही बंगळुरू संघाच्या खेळाडूंनी हरियाणा संघाला उत्तम लढत दिली. सामन्याच्या पंचविसाव्या मिनिटाला हरियाणा संघाला लोण नोंदविण्याची संधी मिळाली. बंगळुरूच्या खेळाडूंनी लोण वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना त्यामध्ये यश मिळाले नाही. सामन्याच्या २८ व्या मिनिटाला पहिला लोण नोंदविण्यात हरियाणाला यश मिळाले. त्यावेळी त्यांच्याकडे दहा गुणांची आघाडी होती. त्यांच्या विनय,शिवम तरटे, यांना उत्तरार्धात सूर गवसला. शेवटची तीन मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे ११ गुणांची आघाडी होती. त्यावेळी आणखी एक लोन नोंदवण्याची त्यांना संधी मिळाली होती तथापि बंगळूर संघाच्यावती अजिंक्य पवार याने एकाच चढाईत तीन गडी बाद करीत सुपररेड नोंदवली. बंगळुरू संघाच्या प्रतीक, जतिन व नितीन रावळ यांनी उत्कृष्ट खेळ केला.
प्रो कबड्डी लीग स्पर्धेच्या सीझन 11 चा विजेता ठरवण्यासाठी 29 डिसेंबर 2024 रोजी ग्रँड फिनाले होणार आहे. हा रंगदार सामना कोण खेळणार याकडे सगळ्यांच्या नजर आहेत.