World Cup: 'तू जगातील सर्वोत्तम स्पिनर...,' WC आधी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं कुलदीप यादबद्दल मोठं विधान

कुलदीप यादव याने गुडघ्याच्या दुखापतीनंतर संघात पुनरागमन केलं आहे. यादरम्यान कुलदीप यादवने आपला वेग, अँगल्स यावर काम केलं असून त्याचा फायदा त्याला होताना दिसत आहे.   

शिवराज यादव | Updated: Oct 1, 2023, 10:46 PM IST
World Cup: 'तू जगातील सर्वोत्तम स्पिनर...,' WC आधी पाकिस्तानच्या माजी कर्णधाराचं कुलदीप यादबद्दल मोठं विधान title=

वर्ल्डकप स्पर्धा सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून भारतीय संघ यावर्षी प्रमुख दावेदार संघ मानला जात आहे. आशिय कपमधील विजय आणि त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिकेत केलेली कामगिरी यामुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. दरम्यान कुलदीप यादवला वर्ल्डकप संघात स्थान देण्यात आलं असून, सध्या तो प्रचंड फॉर्ममध्ये असल्याचा फायदा भारतीय संघाला होण्याची शक्यता आहे. आशिया कपमध्ये आपल्या गोलंदाजीची कमाल दाखवत 28 वर्षीय कुलदीप यादवने एकूण 9 विकेट्स मिळवले. यानंतर त्याला प्लेअर ऑफ द सीरिज पुरस्कार देण्यात आला. यामधील एका सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतले आणि दुसऱ्या सामन्यात 4 विकेट्स घेतले. त्यातच आता 5 ऑक्टोबरपासून वर्ल्डकप सुरु होणार असल्याने कुलदीप यादवकडून चाहत्यांना आणि संघालाही प्रचंड अपेक्षा आहेत. 

कुलदीप यादवने आपल्या गोलंदाजीच्या फिरकीने अनेकांना भुरळ पाडली आहे. यामध्ये पाकिस्तानचे खेळाडूही मागे नाहीत. पाकिस्तानचे माजी कर्णधार इंतिखाब आलम हेदेखील कुलदीप यादवच्या खेळाडूने प्रभावित झाले आहेत. इंतिखाब आलम यांनी कुलदीप यादवचं तोंडभरुन कौतुक केलं असून, भारताला मधल्या ओव्हर्सदरम्यान त्याचा फार फायदा होईल असं म्हटलं आहे. 

कुलदीप यादवने गुडघ्याच्या दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. यादरम्यान त्याने आपला वेग, अँगल्स यावर काम केलं असून याचा त्याला फायदा झाला आहे. आशिया कपच्या त्याच्या बदललेल्या गोलंदाजीची धार पाहायला मिळाली आहे. इंतिखाब आलम यांनी भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान यजमानांना फायदा मिळेल असं म्हटलं आहे. इंतिखाब आलम हे अनेकदा खेळाडू नात्याने भारतात आले आहेत. तसंच पाकिस्तान संघाचे मॅनेजर म्हणून काम केलं आहे. 

"भारतीय संघ ज्याप्रकारे आशिया कपमध्ये खेळला आहे आणि अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केलं आहे ते पाहता प्रचंड फॉर्मात दिसत आहेत. त्यांच्या फिरकी गोलंदाजीची धारही वाढली आहे. कुलदीप या स्पर्धेत मोलाची कामगिरी करणार आहे. तो सर्व संघाच्या फलंदाजांची परीक्षा घेईल," असं इंतिखान आलम यांनी पीटीआयशी संवाद साधताना म्हटलं. 

"रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादव हे प्राणघातक कॉम्बिनेशन आहे. कुलदीप हा मॅचविनर खेळाडू आहे. माझ्या मते वर्ल्डकपमध्ये तो सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज आहे. आता तर रवीचंद्रन अश्विनही संघात परतला आहे," असं 81 वर्षीय इंतिखाब आलम यांनी सांगितलं. इंतिखाब आलम यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व भारतात होशियारपूर येथे झाला होता. फाळणीनंतर त्यांचं कुटुंब पाकिस्तानात गेलं. 

इंतिखाब आलम यांनी भारतीय फलंदाजीचंही कौतुक केलं आहे. विराट कोहली, रोहित शर्मा तसंच सध्या फॉर्मात असणारा शुभमन गिल हे भारतीय संघाला वर्ल्डकप ट्रॉफीचे दावेदार ठरवत असल्याचं ते म्हणाले आहेत.